तिलारीमध्ये ‘अम्युझमेंट पार्क’साठी हालचाली : शिरशिंगे धरणाचा प्रश्नही मार्गी लागणार

 

आमदार दीपक केसरकर यांची मंत्री गिरीश महाजनांशी चर्चा

सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडीचे आमदार आणि माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी नुकतीच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची मुंबईतील ‘सेवासदन’ या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. या भेटीदरम्यान सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील महत्त्वाच्या प्रकल्पांवर सविस्तर चर्चा झाली. यामध्ये दोडामार्ग तालुक्यातील तिलारी धरण प्रकल्पाच्या ठिकाणी प्रस्तावित असलेल्या अम्युझमेंट पार्क आणि सावंतवाडी तालुक्यातील शिरशिंगे येथील मंजूर धरण प्रकल्पाचा समावेश होता.

आमदार केसरकर यांनी तिलारी येथील प्रस्तावित अम्युझमेंट पार्क प्रकल्पाची सद्यस्थिती आणि त्यातील संभाव्य अडचणी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यासमोर मांडल्या. या प्रकल्पाच्या माध्यमातून या भागाला एक मोठे पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्याची योजना आहे. यावर सकारात्मक चर्चा झाली असून, हा प्रकल्प लवकरात लवकर कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन मंत्र्यांनी दिले. या प्रकल्पाच्या जागेची पाहणी करण्यासाठी जलसंपदा मंत्री लवकरच तिलारीला भेट देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

याव्यतिरिक्त, सावंतवाडी तालुक्यातील शिरशिंगे (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील मंजूर धरण प्रकल्पाबाबतही चर्चा झाली. या प्रकल्पाच्या मार्गात येत असलेल्या विविध समस्यांवर तोडगा काढून तो लवकर पूर्ण करण्यासाठी पावले उचलण्यावर भर देण्यात आला. जलसंपदा मंत्र्यांनी यासंदर्भात लवकरच मंत्रालयात आपल्या अध्यक्षतेखाली एक बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिले. या बैठकीत सर्व संबंधित विभागांना एकत्र आणून प्रकल्पातील अडचणींवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल.

आमदार दीपक केसरकर यांच्या या भेटीमुळे सावंतवाडी मतदारसंघातील दोन महत्त्वाच्या प्रकल्पांना गती मिळण्याची चिन्हे आहेत. तिलारी येथील अम्युझमेंट पार्कमुळे स्थानिक पर्यटनाला चालना मिळेल, तर शिरशिंगे धरणामुळे शेती आणि पाणीपुरवठ्याचा प्रश्न सुटण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे.