सहकारी संस्थांना बळकट करण्यासाठी केंद्र सरकारने घ्यावा पुढाकार : प्रमोद गावडे 

सावंतवाडी तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाची ६३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा 

सावंतवाडी । प्रतिनिधी : सहकारातील संस्थांना अधिक बळकट करण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन सावंतवाडी तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष प्रमोद गावडे यांनी केले. केंद्र सरकारने लागू केलेल्या सहकार कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करून संस्थांना मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले.

सावंतवाडी तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाच्या ६३व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. ही सभा संघाच्या सभागृहात अध्यक्ष प्रमोद गावडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उपाध्यक्ष रघुनाथ रेडकर, शशिकांत गावडे, प्रवीण देसाई, ज्ञानेश परब, गुरुनाथ पेडणेकर, दत्ताराम हरमलकर, आत्माराम गावडे, विनायक राऊळ, अभिमन्यू लोंढे, दत्ताराम कोळमेकर, जिल्हा बँकेचे संचालक गजानन गावडे, रश्मी निर्गुण आणि व्यवस्थापक महेश परब उपस्थित होते.

अध्यक्ष गावडे यांनी आपल्या भाषणात शेतकरी आणि सहकार क्षेत्रापुढील अडचणी मांडल्या. शेतकऱ्यांकडून खतांची मागणी घटली असून, ई-पीक नोंदणी कमी होत असल्यामुळे हमी भावाने भात खरेदीवर परिणाम होत आहे. यासोबतच, भात खरेदी आणि गोदाम भाडे वेळेवर मिळत नसल्याने खरेदी-विक्री संघाला स्वतःच्या खर्चातून ते भागवावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे, या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारने लक्ष घालण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

*ज्येष्ठ सभासद आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार*

सभेमध्ये संघातील ज्येष्ठ सभासद रामचंद्र राऊळ, पांडुरंग नाईक, प्रकाश देसाई, अशोक देसाई, दशरथ देसाई, मंगेश सावंत, शिवाजी नाईक, रमाकांत सावंत, गजानन गावडे आणि ज्ञानेश्वर ठाकर यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

याचबरोबर, दहावी, बारावी आणि शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचाही गुणगौरव करण्यात आला. यामध्ये हितेश गावडे, अवनीश लोंढे, धैर्य कोळमेकर, काव्या रेडकर आणि गौरंग गावकर यांचा समावेश होता.

यावेळी सुनील देसाई, रमेश गावकर, सी. एल. नाईक, गजानन गावडे, मंगेश सावंत, अरुण गावडे, सुरेश गावडे, बापू सावंत यांच्यासह अनेक सभासदांनी चर्चेत भाग घेऊन विविध सूचना मांडल्या. या सभेत सर्वसमावेशक चर्चा होऊन सहकाराच्या पुढील वाटचालीवर महत्त्वपूर्ण विचारमंथन करण्यात आले.