मालवाहू ट्रक व पिकअप टेम्पो पलटी
दोडामार्ग (प्रतिनिधी): दोडामार्ग – बांदा मार्गावर आडाळी – कोसमवाडी येथील वळणावर आज सकाळी दोन वेगवेगळ्या गाड्यांचे अपघात झालेत. या अपघातात मालवाहू ट्रक आणि बोलेरो पिकअप गाडी रस्त्यावर उलटल्या. पिकअप गाडी उलटताना बससाठी स्टॉपवर येणारी स्थानिक वृद्धा बालंबाल बचावली.

पावसाळ्याच्या सुरुवाती पासूनच रस्त्याच्या साईडपट्ट्या खचल्याने आतापर्यंत याठिकाणी आठ अपघात झाले आहेत. आज झालेल्या अपघातांमध्ये मालवाहू ट्रक रस्त्याच्या कडेला उलटला. तर बोलेरो पिकअप रस्त्यावर पलटी झाली. सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नाही.
अपघातानंतर वाहतूक काही काळ थांबली होती. स्थानिक नागरिकांनी मदतकार्य केल्याने सध्या एकतर्फी वाहतूक सुरू आहे. याठिकाणी रेलिंग बसवावेत, अशी मागणी वाहनचालक आणि स्थानिकांकडून होत आहे.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची पाईपलाईन तसेच एमएनजीएल गॅस पाईपलाईन टाकण्यासाठी मार्गालगत खोदाई केल्याने मार्ग वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. धोकादायक ठिकाणी रेलिंग उभारण्याची मागणी यापूर्वी करण्यात आली होती. मात्र, सार्वजनिक बांधकाम प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे अपघाताची मालिका सुरू आहे. प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन त्वरीत कार्यवाही करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते संदेश देसाई यांनी केली आहे.












