मुणगेचे बोरकर कुटुंबीय जपतायत समाज प्रबोधनात्मक ‘चलचित्र ‘ देखव्याची परंपरा!

मसुरे | झुंजार पेडणेकर :               मोबाइल ही काळाची गरज बनली आहे. माणसे छोट्या छोट्या गोष्टी साठी मोबाइल वर अवलंबून राहू लागली आहेत. मोबाइल वापराचा हा बदल जीवनात कसा बदलत गेला आणि पालकांनी मुलांच्या मोबाइल वापरावर नियंत्रण ठेवणे याचे यथार्थ दर्शन ‘चलचित्रांच्या’ माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे तो देवगड तालुक्यातील मुणगे आडवळवाडी येथील बोरकर कुटुंबियांच्या घरी! अकरा दिवसांसाठी विराजमान गणेशोत्सवात हा देखावा पाहण्यासाठी गणेश भक्तांची गर्दी होत आहे. प्रति वर्षी गणेशोत्सवाच्या माध्यमातून विविध विषयावर समाजप्रबोधन करणारे चलचित्र देखावे बोरकर कुटुंबीय सादर करतात. यावर्षी मोबाइल च्या जाळ्यात अडकलेली आजची पिढी ही थीम ठेवून हा देखावा करण्यात आला आहे. सकाळी उठण्यासाठी कोंबड्याची साद मागे पडली असून त्याची जागा मोबाइल अलार्मने घेतली आहे. छोटी मुले रडायला लागल्यावर पूर्वी अंगाई म्हटली जायची त्याऐवजी आता मुलाच्या हातात मोबाइल दिला जातो. कॅमेरॅची जागा आता मोबाइल कॅमेरॅने घेतली असून सेल्फीच्या नादात अनेक जीव नाहक जात आहेत. अशा विविध गोष्टी या चलचित्र देखाव्यात मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. चलचित्र देखाव्याला ध्वनीमुद्रण व आवश्यक प्रकाश योजना करण्यात आल्याने हा देखावा अधिक जिवंत वाटत आहे. संदीप बोरकर यांची या देखाव्याची संकल्पना असून गणपती मूर्ती मुणगे येथील शिवदास रासम यांनी बनविली आहे. देखावा कलाकृती, सजावट आणि ध्वनीमुद्रण यासाठी विजय बोरकर, भारती बोरकर, ओंकार बोरकर,

अमिता बोरकर, निकेता बोरकर,उर्मिला बोरकर, शोभा बोरकर ,संदिप बोरकर ,स्वरांजली बोरकर,सर्वेश बोरकर ,

सुनिल बोरकर, राजेंद्र बोरकर , रूचिता बोरकर ,मोहित बोरकर , कुजांली बोरकर

सुरेश बोरकर , सुर्वणा बोरकर, सविता बोरकर, सुविधा बोरकर,

देविदास बोरकर , देवयानी बोरकर , कृतिका बोरकर

विश्वनाथ बोरकर , विशाखा बोरकर यांचे सहकार्य लाभले. मोबाइलचा योग्य आणि मर्यादित वापर केल्यास तो वरदान ठरू शकतो, पण अतिवापर केल्यास तो शाप बनू शकतो. त्यामुळे पालकांनी मुलांना मोबाइल पासून किती जवळ ठेवावे हे पालकांच्याच हातात आहे असे शेवटी या देखाव्याच्या संदेशात सांगण्यात आले आहे.