चिपळूण (प्रतिनिधी) : खेंड गणपती मंदिर ते खंड बायपास मार्गावरील स्पीड ब्रेकरवर पांढरे पट्टे मारावेत, भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा तसेच बावशेवाडी येथील नादुरुस्त गटाराची पुनर्बांधणी करावी, अशा विविध मागण्या महालक्ष्मी मित्र मंडळ महालक्ष्मीनगर, चिपळूण यांच्या वतीने नगर परिषदेकडे करण्यात आल्या आहेत.
मंडळाचे अध्यक्ष यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, “खेंड गणपती मंदिर ते बायपास मार्गावर स्पीड ब्रेकर आहेत, मात्र रात्रीच्यावेळी ते दिसत नसल्याने अपघाताची शक्यता वाढते. त्यामुळे या स्पीड ब्रेकरवर पांढरे पट्टे मारणे आवश्यक आहे.” तसेच खेंड बायपास परिसरात १० ते १५ भटक्या कुत्र्यांचा त्रास होत असून पादचारी, प्रवासी व वयोवृद्ध नागरिकांना धोका निर्माण होत असल्याने नगर पालिकेने तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. याशिवाय, खेड बावशेवाडी येथे श्री. विशाल रमेश जानवलकर यांच्या घरासमोरील गटार पूर्णपणे नादुरुस्त झाले आहे. त्यामुळे पाण्याचा निचरा होत नाही व गटारे तुंबतात. त्यामुळे नगर परिषदेने गटाराची पुनर्बांधणी करून नागरिकांची गैरसोय दूर करावी, असेही मंडळाने नमूद केले आहे.
या मागण्यांचा विचार करून नगर परिषदेने तातडीने कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. निवेदनाची प्रत आमदार शेखर निकम यांनाही देण्यात आली आहे. यावेळी माजी उपनगराध्यक्ष सुधीर शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट मागासवर्गीय सेल चिपळूण तालुकाध्यक्ष विशाल जानवलकर, सेवानिवृत्त अभियंता रमेश कादवडकर, नागेश बोंडकर आदी उपस्थित होते.












