चिपळूण (प्रतिनिधी) : ऊन-पावसाची, वादळ-वाऱ्याची तमा न करता आणि प्रत्येक सणासुदीला सतत शिट्या फुंकत वाहतूक व्यवस्था सुरळीत करताना कुठेही पोलिसी खाक्या न दाखवणाऱ्या ट्राफिक हवालदार गणेश नाळे आणि अशोक पवार यांचा मनसे वाहतूकसेनेच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला. गणेशोत्सवात वाहतूक सुरळीत करण्यात या दोन हवालदार याचा मोठा सहभाग होता.
शहरातील बहदूरशेख आणि चिंचनाका या ठिकाणी हररोज ट्राफिक जाम होते. बहदूरशेखनाका हा कोकणातील महत्वपूर्ण नाका आहे. या ठिकाणाहून पश्चिम महाराष्ट्र आणि तळकोकणात जाता येत असल्याने सणासुदीला वाहनांच्या रंगाचा लागत असतात. त्यात महामार्गाचे काम सुरू असल्याने वाहतुकीचा बोजवारा नेहमी उडत असतो. मात्र, बहादूरशेख येथे सेवा बजावणारे गणेश नाळे यांनी वाहनांची गर्दी असतानाही ट्राफिक खोलंबून दिली नाही. चार रस्ते एकत्र आले असलेल्या नाक्यात इकडून तिकडे आणि तिकडून इकडे अशी शिट्या घालत धावपळ करत गणेशोत्सवला जाणाऱ्या चाकरमानी वर्गाला कोणताही विलंब त्यानी लावून दिला नाही. पोलीस खात्यात आहे म्हणून काम करण्यापेक्षा वाहनचालकाना कोणताही त्रास होऊ नये या प्रामाणिक हेतूने काम करण्याच्या वृत्तीने मनसेचे वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष राजू खेतले यांनी त्यांचा सत्कार केला तर अशीच स्थिती असणाऱ्या चिंचनाक येथे कार्यरत असणारे अशोक पवार यांच्या कामाचेही कौतुक करण्यात आले. यावेळी मनसेचे प्रदीप संसारे,संजय जाधव, विठ्ठल मते, राहुल शिंदे, मदार आयरे, संजय भोसले, मनीष कामत, भाऊ सुर्वे, सागर गांधी, राकेश शेट्टे, किरण हलदे आदी पदाधिकारी उपस्थित होते.












