घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये जीआयटी क्वांटआयक्यू हबचे दिमाखदार उद्घाटन

खेड (प्रतिनिधी) : खेड येथील घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या सिव्हिल अभियांत्रिकी विभागात विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परीक्षा तयारीसाठी उपयुक्त ठरणाऱ्या जीआयटी क्वांटआयक्यू हब (QUANTIQ HUB) या नव्या केंद्राचे दिमाखदार उद्घाटन करण्यात आले. कोकणातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण मार्गदर्शन व अध्ययनाचे साधनसंपन्न व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हे केंद्र सुरू करण्यात आले असून, महाविद्यालयातीलच नव्हे तर बाहेरील विद्यार्थ्यांनाही या उपक्रमाचा लाभ होणार आहे.
या केंद्राचे उद्घाटन ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ व मार्गदर्शक सदस्य डॉ. ए. बी. मराठे यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना डॉ. मराठे म्हणाले की, “GATE, ESE, UPSC, MPSC अशा राष्ट्रीय व राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षांत विद्यार्थ्यांना यश मिळविण्यासाठी हे केंद्र प्रभावी ठरेल आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी हे एक मोठे व्यासपीठ ठरेल.”
समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून टीसीएसचे माजी प्रोग्राम डायरेक्टर श्री. गिरीश दांडीगे व प्राचार्य डॉ. प्रमोद पाटील उपस्थित होते. तसेच सिव्हिल अभियांत्रिकी विभागाचे माजी विद्यार्थी व उद्योजक श्री. शुभम देवळेकर यांनीही या उपक्रमासाठी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.
कोकण विभागातील बारावी विज्ञान, अभियांत्रिकी पदवी व डिप्लोमा अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी हे केंद्र उपयुक्त ठरणार आहे. या केंद्रामध्ये फाउंडेशन, इंटरमिजिएट व अॅडव्हान्स अशा तीन स्तरांवर अभ्यासक्रम रचण्यात आले असून, क्वांटिटेटिव्ह अॅप्टिट्यूडसह स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक कौशल्यांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
हे अभ्यासक्रम विविध शासकीय सेवा परीक्षा, बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या स्क्रीनिंग टेस्ट तसेच विभागीय परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना सक्षम पायाभूत तयारी घडवून आणतील. त्यामुळे कोकणातील विद्यार्थ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण शैक्षणिक संधी ठरणार आहे.
स्पर्धा परीक्षा तयारी केंद्र प्रा. व्ही. आर. कासार व प्रा. एन. एच. कोप्पा यांच्या नेतृत्वाखाली चालविले जाणार आहे. सिव्हिल अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ. योगेश कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन केले. संपूर्ण कार्यक्रमाचे समन्वयन प्रा. एन. एच. कोप्पा व प्रा. व्ही. आर. कासार यांनी केले.