जीआयटीमध्ये प्रथम वर्ष अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ उत्साहात साजरा

खेड प्रतिनिधी : घरडा अभियांत्रिकी महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये प्रवेश घेतलेल्या प्रथम वर्ष अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ अभियंता दिनाच्या (15 सप्टेंबर) औचित्याने अतिशय उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. या सोहळ्याला महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य आणि नामवंत शिक्षणतज्ञ डॉ. अनंत मराठे यांची प्रमुख पाहुणे म्हणून सन्माननीय उपस्थिती लाभली.
या कार्यक्रमाची सुरुवात जीआयटी समूहगानाने झाली. तत्पूर्वी प्रथम वर्षात मागील वर्षी उत्कृष्ट गुण प्राप्त करून पहिल्या तीन क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. कु. श्रावणी देसाई हिने प्रथम क्रमांक मिळवून 5000 रुपयांचे पारितोषिक प्राप्त केले. कु. प्रांजल शिदे हिला द्वितीय क्रमांकासाठी 4000 रुपये आणि साद जुवळे याला तृतीय क्रमांकासाठी 3000 रुपये रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले.
या प्रसंगी प्रथम वर्ष विभागप्रमुख डॉ. एम. एस. सातपुते यांनी सर्व नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत करत त्यांच्यासाठी लागू असलेल्या मुंबई विद्यापीठाच्या अध्यापन पद्धतीची माहिती दिली. अधिष्ठाता डॉ. नितीन कोळेकर यांनी ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020’ आणि त्यामधील विद्यार्थी केंद्रित तरतुदींवर भाष्य केले. प्राचार्य डॉ. पी. बी. पाटील यांनी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या सोयीसुविधा, प्रयोगशाळा, प्रकल्प उपक्रम तसेच शैक्षणिक विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती विद्यार्थ्यांना दिली.
मुख्य पाहुणे डॉ. अनंत मराठे यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणाची सुरुवात कै. डॉ. केकी घरडा यांच्या स्मरणाने केली. त्यांच्या कार्यातून विद्यार्थ्यांनी घ्यावयाचा धडा अधोरेखित करत जगभरातील चालू घडामोडींमध्ये अभियंत्यांची भूमिका कशी असावी यावर त्यांनी विशेष भर दिला. अभियंता दिनाचे औचित्य साधत त्यांनी जागतिक दर्जाचे अभियंता कै. डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या कार्याची आठवण करून विद्यार्थ्यांना आधुनिक भारताच्या जडणघडणीतील त्यांचे योगदान समजावून सांगितले. तसेच प्रत्येक अभियंता समाजाभिमुख होऊन समाजातील समस्यांवर तांत्रिक तोडगे शोधू शकतो का, याचा सातत्याने विचार करण्याचे आवाहन केले. या समारंभाचे सूत्रसंचालन प्रा. होवाळ यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. पोतदार यांनी मानले. या कार्यक्रमात सर्व विद्यार्थी, प्राध्यापकवर्ग आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी उत्साहाने सहभाग घेतला. समारंभाचे नियोजन डॉ. नितीन कोळेकर यांनी केले. तसेच विभाग प्रमुख डॉ. सातपुते, प्राचार्य डॉ. पी. बी. पाटील, उपप्राचार्य डॉ. सचिन पाटील आणि रजिस्ट्रार मा. संदीप मुनघांटे यांचे मार्गदर्शन लाभले.