खेड शहरात भटक्या कुत्र्यांचा वाढता त्रास; के.जी. अँड पार्क परिसरातील व्हिडिओमुळे नागरिक संतप्त

खेड (प्रतिनिधी) : खेड शहरातील विविध प्रभाग, वाड्या आणि वस्त्यांमध्ये भटक्या कुत्र्यांचा त्रास दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. खेड शहरातील के.जी. अँड पार्क परिसरात मोकाट कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात असल्याचा व्हिडिओ समोर आला असून, या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे.
रस्त्यांवर तसेच रहिवासी भागात कुत्र्यांच्या झुंडी फिरताना दिसत असल्याने लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि दुचाकीस्वारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी मोकाट कुत्र्यांचा त्रास अधिक वाढत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. कुत्र्यांच्या झुंडीमुळे दुचाकीस्वारांचा पाठलाग होणे, वाहनावरील नियंत्रण सुटणे किंवा अपघात होण्याची शक्यताही निर्माण होते.
या पार्श्वभूमीवर खेड नगरपरिषदेने भटक्या कुत्र्यांच्या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत खेड नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.
शिवसेना अल्पसंख्याक शहर प्रमुख सरफराज पांगारकर यांनी दिलेल्या निवेदनात खेड शहरातील विविध प्रभाग, वाड्या आणि वस्त्यांमध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या वाढल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असल्याचे नमूद केले आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या समस्येवर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
निवेदनात भटक्या कुत्र्यांवर नियमांनुसार निर्बंधनाची कार्यवाही, आवश्यक पशुवैद्यकीय उपाययोजना, लसीकरण आणि नसबंदी यांसारख्या उपाययोजना राबविण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच ज्या प्रभागांमध्ये भटक्या कुत्र्यांचा त्रास अधिक आहे, त्या भागांची प्रत्यक्ष पाहणी करून प्रभागनिहाय नियोजन आणि नियमित कार्यवाही करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
दरम्यान, एखाद्या व्यक्तीला भटक्या कुत्र्याने चावा घेतल्यास नागरिकांनी घाबरून न जाता जखम तातडीने साबण आणि वाहत्या पाण्याने सुमारे १५ मिनिटे धुवावी आणि विलंब न करता डॉक्टरांकडे जाऊन रेबीज प्रतिबंधक उपचारांबाबत वैद्यकीय सल्ला घ्यावा. कुत्र्याच्या चाव्याच्या जखमेवर घरगुती उपचार करून वेळ घालवणे टाळणे आवश्यक आहे.
मोकाट कुत्र्यांचा प्रश्न हा केवळ एका परिसरापुरता मर्यादित न राहता संपूर्ण शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेशी संबंधित असल्याने खेड नगरपरिषदेने याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. के.जी. अँड पार्क परिसरातील व्हिडिओनंतर नागरिकांमधूनही तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत असून, नगरपरिषद प्रशासन आता या समस्येवर कोणती ठोस कार्यवाही करते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.