घरात चारचाकी गाडी असल्याचे कारण देत प्रशासनाचा निर्णय
चिपळूण (वार्ताहर) : शासनाच्या लाडकी बहीण या महत्त्वाकांक्षी योजनेतून चिपळूण तालुक्यातील एका गरजू महिलेचा अर्ज प्रशासनाने बाद केल्याने संताप व्यक्त होत आहे. कौंढरताम्हाणे येथील संगीता तावडे या मोलमजुरी करून जगणाऱ्या महिलेचा अर्ज “घरात गाडी असल्याने पात्र नाही” या कारणावरून बाद करण्यात आला आहे. श्रीमती तावडे यांच्या नावावर गाडी नसूनही तिचा अर्ज बाद केला आहे. संगीताबाई तावडे यांच्या पतीचे निधन बारा वर्षांपूर्वी झाले. त्यानंतर तीन वर्षांच्या मुलीला घेऊन त्या कच्च्या घरात वास्तव्यास आहेत. दैनंदिन मोलमजुरी करून संसाराचा गाडा ओढणाऱ्या संगीताताईंचे उत्पन्न अत्यल्प असून एकवेळ पोट भरायलाही संघर्ष करावा लागतो. अशा परिस्थितीत त्यांच्या नावावर गाडी असल्याचे दाखवून अर्ज बाद करण्यात आल्याने हा प्रकार धक्कादायक ठरला आहे.
“आमची आणि आमच्या घराची अवस्था बघा. आम्ही जगण्यासाठी धडपडत आहोत, पोट भरण्यासाठीही कसरत करावी लागते. गाडी कुठून आणू? आमच्या नावावर दाखवलेली गाडी कोणी दाखवली, हेच आम्हाला माहीत नाही,” असा संतप्त सवाल संगीताताई तावडे यांनी उपस्थित केला. लाडकी बहीण योजनेचा उद्देश गरजू महिलांना आर्थिक आधार देणे हा आहे. परंतु ज्यांना खरोखर मदतीची गरज आहे, त्यांचा अर्ज फेटाळला जाणे ही शासन यंत्रणेची चेष्टा असल्याचे ग्रामस्थांमध्ये बोलले जात आहे. या प्रकरणाची चौकशी करून, ज्यांच्याकडे प्रत्यक्षात वाहन नाही अशा महिलांना न्याय मिळावा, अशी मागणी ग्रामस्थांसह विविध समाज घटकांतून होत आहे.












