ज्ञानदीप भडगावच्या तनुश्री नारकरची विभागीय तायक्वांदो स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी

खेड (प्रतिनिधी) : ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ खेड (रत्नागिरी) संचालित कै. श्रीमती राधाबाई चंदुलाल तलाठी ज्ञानदीप विद्या मंदिर, भडगाव (उच्च माध्यमिक विभाग) येथील इयत्ता 12वी कॉमर्सची विद्यार्थिनी तनुश्री गणेश नारकर हिने विभागीय तायक्वांदो स्पर्धेत चमकदार कामगिरी करत भडगाव व खेड तालुक्याचा मान उंचावला आहे.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे आणि जिल्हा क्रीडा कार्यालय, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने नुकत्याच कोल्हापूर येथे विभागीय तायक्वांदो स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत 68 किलो वजनी गटात तनुश्रीने उत्तम खेळाची प्रचिती देत द्वितीय क्रमांक पटकावला व रौप्य पदक मिळवले. तिच्या या यशामुळे शाळेसह संस्थेचे नाव गौरवाने घेतले जात आहे.
याआधी डेरवण येथे झालेल्या जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेतही तनुश्रीने 19 वर्ष वयोगटात प्रथम क्रमांक पटकावत आपली गुणवत्ता सिद्ध केली होती. त्याचबरोबर इयत्ता सहावीत शिकणारा अर्णव तुषार चव्हाण याने 14 वर्ष वयोगटात तृतीय क्रमांक मिळवत क्रीडांगणात आपले कौशल्य दाखवले होते.
तनुश्रीच्या या यशाबद्दल तिचे पालक तसेच मार्गदर्शक शिक्षक शशांक घडशी व संतोष भोसले यांचे विशेष कौतुक होत आहे. संस्थेचे अध्यक्ष अरविंद तोडकरी, उपाध्यक्ष डॉ. रमणलाल तलाठी, सरचिटणीस माधव पेठे, खजिनदार विनोद बेंडखळे, विश्वस्त व जनसंपर्क अधिकारी दीपक लढढा, विश्वस्त पेराज जोयसर, भालचंद्र कांबळे, संस्थापक सरचिटणीस प्रकाश गुजराथी, संस्थापक सदस्य चंदन पाटणे, प्रफुल्ल महाजन, अनिल शिवदे, रुपल पाटणे यांच्यासह सल्लागार मंडळ सदस्य, ज्ञानदीप परिवारातील सर्व मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी तनुश्री व अर्णवचे हार्दिक अभिनंदन केले.