आझाद मैदानावर महाराष्ट्र सकल गोपाळ समाजाचा एकदिवसीय लाक्षणिक उपोषण

खेड (प्रतिनिधी) : महाराष्ट्र सकल गोपाळ समाजाच्या विविध मागण्यांसाठी आवाज उठविण्यासाठी समाजाच्या वतीने येत्या २५ सप्टेंबर २०२५ रोजी गुरुवारी मुंबईतील आझाद मैदानावर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत होणाऱ्या या उपोषणासाठी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
यासंदर्भात समाजाच्या वतीने आझाद मैदान पोलिस ठाण्यात लेखी निवेदन सादर करून परवानगी मागण्यात आली आहे. या उपोषणामध्ये सुमारे ४०० ते ६०० लोक सहभागी होणार असून उपोषण शांततेत पार पडावे, तसेच शासनाने समाजाच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या एक दिवसीय लक्षणे उपोषणाला प्रशासनाने काही अटी व शर्तीसह परवानगी दिली आहे.
या संदर्भात बळीराम निकम, उपसरपंच सुकवली व जिल्हा सचिव, महाराष्ट्र सकल गोपाळ समाज यांनी आवाहन केले आहे की, “गोपाळ समाजाचे हक्क आणि प्रश्न मांडण्यासाठी होणाऱ्या या एकदिवसीय लाक्षणिक उपोषणामध्ये समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.”
महाराष्ट्र सकल गोपाळ समाजाचे प्रमुख कार्यकर्ते अशोक जाधव बनगावकर यांनीही पोलिस प्रशासनास विनंती केली आहे की, समाजाच्या हक्कांसाठी होणाऱ्या या लढ्याला कायदेशीर परवानगी द्यावी आणि उपोषण सुरळीत पार पडण्यासाठी आवश्यक ती मदत करावी.
या आंदोलनाच्या निमित्ताने मुंबईसह संपूर्ण राज्यातील गोपाळ समाजातील बांधव मोठ्या प्रमाणात एकत्र येणार असून शासनाने त्यांच्या मागण्यांकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.