भारतीय जैन संघटना शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सज्ज – पूरग्रस्तांसाठी ठोस अॅक्शन प्लॅन जाहीर

खेड (प्रतिनिधी) – 
महाराष्ट्र राज्यात यंदा ओल्या दुष्काळासह अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीने शेतकरी व सर्वसामान्यांचे जीवन उध्वस्त केले आहे. घरदार वाहून गेले, शेतजमिनी पाण्याखाली गेल्या, जनावरे चाऱ्यावाचून उपाशी पडली आणि अनेक कुटुंबे उघड्यावर आली. शेतकरी वर्ग आर्थिक, सामाजिक आणि मानसिकदृष्ट्या कोलमडला आहे. या संकटाच्या काळात भारतीय जैन संघटना (BJS) शेतकऱ्यांसाठी आधारवड ठरत मदतीसाठी पुढे सरसावली आहे. २४ सप्टेंबर रोजी संस्थापक शांतिलालजी मुथ्था यांच्या मार्गदर्शनाखाली ऑनलाईन बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत राष्ट्रीय अध्यक्ष नंदकिशोर सांखला, राज्याध्यक्ष केतन शहा, राज्यमहासचिव प्रवीण पारख, मॅनेजिंग डायरेक्टर कोमल जैन यांनी पूरस्थितीचे गांभीर्य अधोरेखित करून मार्गदर्शन केले. राज्यातील सर्व जिल्हा व तालुका पातळीवरील कार्यकर्त्यांनी आपल्या भागातील विदारक परिस्थिती मांडली आणि या आपत्तीवर मात करण्यासाठी ठोस अॅक्शन प्लॅन आखण्यात आला.
भारतीय जैन संघटना ही मागील चाळीस वर्षांपासून महाराष्ट्रातील संकटग्रस्तांसोबत खंबीरपणे उभी राहिली आहे. यावेळीदेखील कार्यकर्त्यांनी तत्परतेने पूरग्रस्त भागांसाठी मदत आराखडा निश्चित केला आहे. विस्थापितांना जेवण-खावण पुरविणे, वैद्यकीय सेवेची सोय करणे, जिल्हा व तालुका पातळीवर कार्यकर्त्यांची फळी तयार करणे, मंदिरे व स्थानिक संस्थांच्या मदतीने जनावरांसाठी चारा उपलब्ध करून देणे या सर्व बाबींवर विशेष भर देण्यात आला आहे. मानवी हानी झालेल्या कुटुंबांचे दु:ख कमी करण्यासाठी बीजेएसने मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या मुलांच्या ५ वी ते १२ वी पर्यंतच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली आहे. तसेच गेल्या काही वर्षांत आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांना शैक्षणिक पुनर्वसनासाठी वाघोली येथे आणण्याची योजना आखली आहे. शिक्षणाद्वारे या मुलांचे भविष्य घडविण्याचा निर्धार संघटनेने केला आहे.
पूरामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान इतके प्रचंड झाले आहे की त्यांच्या मुला-मुलींच्या विवाहाचे प्रश्नही गंभीर बनले आहेत. या समस्येवर उपाय म्हणून डिसेंबर-जानेवारी महिन्यात जिल्हास्तरावर सामूहिक विवाह सोहळे आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात स्थानिक साखर कारखाने तसेच इतर संस्थांचे सहकार्य घेण्याचे ठरविण्यात आले असून, या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल आणि आत्महत्यांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे.
या संपूर्ण कार्याचे प्रोजेक्ट डायरेक्टर म्हणून राज्यमहासचिव प्रवीण पारख यांची नियुक्ती करण्यात आली असून, राष्ट्रीय अध्यक्ष नंदकिशोर सांखला, राज्याध्यक्ष केतन शहा, राज्य कार्यकारिणी सदस्य उत्तमकुमार जैन, कोकण विभागीय अध्यक्ष योगेश जैन तसेच स्थानिक जिल्हाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली हे कार्य प्रभावीपणे राबवले जाणार आहे.
भारतीय जैन संघटनेने समाजातील स्वयंसेवी संस्था, उद्योजक तसेच दानशूर व्यक्तींना आवाहन केले आहे की, या संकटग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी हातभार लावावा. इच्छुकांनी स्थानिक शाखेशी किंवा ९४२२३४४८५१ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.