सिंधुदुर्ग । प्रतिनिधी : अतिरिक्त वनक्षेत्रपाल, दोडामार्ग आणि अन्य वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून तसेच जीवे मारण्याची धमकी देऊन शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी अटकेत असलेले दौलतराव राणे (रा. बांबार्डे) यांची ओरोस येथील मे. जिल्हा व सत्र न्यायालयाने निर्देष मुक्तता केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, दि. ५ जून २०२० रोजी दुपारी १२.३० वाजता अतिरिक्त वनक्षेत्रपाल दोडामार्ग हे आपल्या स्टाफसह कोनाळ वनपरिमंडळातील नियतक्षेत्र बांबार्डे येथील वनसर्वे क्र. ३३ व ३७ निर्णितवन क्षेत्रामध्ये वृक्षतोड करून झालेल्या अतिक्रमणाबाबत तपासणी करत होते.
यावेळी स्थानिक रहिवासी असणारे मदन शिवराम राणे, दयानंद शिवराम राणे, दौलत दयाराम राणे, संदेश दौलत राणे आणि सुरज दौलत राणे या पाच इसमांनी उपस्थित वन विभागातील कर्मचाऱ्यांना हातवारे करून दमदाटी केली. तसेच, अश्लील भाषेत शिवीगाळ करून ‘तुम्ही सगळे चोर आहात’ असे बोलून वारंवार ‘चोर चोर’ असा नामोल्लेख केला. ‘गेटआऊट’ बोलून धमकी दिली. इतकेच नव्हे तर, ‘वनविभागाचा एकही कर्मचारी सदर भागात दिसू नये, दिसल्यास तुमच्या वाहनाची तोडफोड करून तुम्हाला जीवे मारण्यात येईल,’ अशी जीवे मारण्याची धमकी देखील दिली, असा आरोप करण्यात आला होता.
तर या घटनेमुळे सरकारी कामात अडथळा निर्माण झाला म्हणून आरोपींवर भारतीय दंड संहिता कलम ३५३, ५०४, ५०६, १४३, १४७, १४९, १८८, २६९, २७०, २७१ तसेच महाराष्ट्र कोविड-१९ विनियमन, २०२० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि त्यांना अटकही करण्यात आली होती.
सदर खटल्यामध्ये संशयित आरोपींतर्फे ॲड. अनिल कृष्णा निरवडेकर यांनी महत्त्वपूर्ण युक्तिवाद केला. त्यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून ओरोस येथील मे. जिल्हा व सत्र न्यायाधीशांनी संशयित दौलतराव राणे यांची निर्दोष मुक्तता केली.
या प्रकरणी ॲड. अनिल कृष्णा निरवडेकर यांच्यासोबत ॲड. गणेश चव्हाण, ॲड. दत्तप्रसाद ठाकूर, ॲड. केतन जाधव, ॲड. वामन सावंत आणि ॲड. प्रितेश गवस यांनी काम पाहिले.











