जिल्हास्तरीय शालेय खो-खो स्पर्धेत लांजा हायस्कूलचा १७ वर्षांखालील मुलांचा संघ अजिंक्य

लांजा (प्रतिनिधी) जिल्हास्तरीय शालेय खो-खो स्पर्धेत लांजा हायस्कूलच्या १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने उत्कृष्ट कामगिरी करत विजेतेपद पटकावले.
सदर स्पर्धा नुकतीच डेरवण येथे पार पडली.
अंतिम सामन्यात लांजा हायस्कूलने नूतन विद्यामंदिर ओणीचा पराभव करून जिल्हा विजेतेपद आपल्या नावावर केले. या विजयासह लांजा हायस्कूलचा संघ आता विभागीय स्तरावरील स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. या संघातील मनीष पालये, समर्थ उपशेट्ये, साई तुळसणकर, पुष्कर पालये, सार्थक पडये आणि पार्थ गुरव या खेळाडूंनी संपूर्ण स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला आहे.

शाळेच्या परंपरेला साजेसे यश मिळवत या खेळाडू विद्यार्थ्यांनी संस्थेचे व शाळेचे नाव उज्वल केले आहे. या संघाला क्रीडा शिक्षक रविंद्र वासुरकर यांचे मार्गदर्शन लाभले असून, प्रशालेचे मुख्याध्यापक सुनील पाटोळे, संस्था अध्यक्ष जयवंत शेट्ये, तसेच कार्यकारिणी मंडळ, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि पालकवर्ग यांनी संघाचे अभिनंदन केले.