लांजा पंचायत समिती आरक्षण जाहीर

प्रभानवल्ली, भांबेड, साटवली हे गण सर्वसाधारण साठी खुले

लांजा( प्रतिनिधी): लांजा पंचायत समिती आरक्षण सोडत आज सोमवारी १३ ऑक्टोबर रोजी
लांजा तहसील कार्यालय या ठिकाणी पार पडली. आठ जागांपैकी दोन जागा सर्वसाधारण स्त्री, एक जागा अनुसूचित जाती स्त्री, एक जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग, एक जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री तर तीन जागा सर्वसाधारण राहिल्या आहेत.
आठ गणांसाठी काढण्यात आलेल्या या आरक्षणाचा फटका अनेक इच्छुकांना बसला आहे. तर काही इच्छुक उमेदवारांचा फायदाही झालेला असल्याने इच्छुकांमध्ये कभी खुशी कभी गम असे वातावरण पाहायला मिळाले.
जिल्हा परिषद शाळा लांजा नं. ५ शाळेतील इयत्ता पाचवीत शिकणाऱ्या कु. प्रणित महेश लिंगायत या विद्यार्थ्याच्या हस्ते चिठ्ठया काढून हि सोडत काढण्यात आली. यावेळी उपजिल्हाधिकारी (रोजगार हमी योजना) श्रीम. हर्षलता गेडाम, लांजा तहसीलदार प्रियांका ढोले, निवासी नायब तहसीलदार अनिल गोसावी, महसूल नायब तहसीलदार सुरेंद्र भोजे आदि उपस्थित होते.
लांजा पंचायत समितीचे एकूण आठ गण आहेत यामध्ये पडलेले आरक्षण पुढीलप्रमाणे प्रभानवल्ली, भांबेड, साटवली हे गण सर्वसाधारण साठी खुले राहिले आहेत. आसगे व गवाणे सर्वसाधारण स्त्री साठी आरक्षित झाले आहेत. वेरवली खुर्द हा गण अनुसूचित जातीसाठी राखीव तर वाकेड हा पं.स.गण – नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री तर खानवली हा नागरिकांचा मागास प्रवर्ग (सर्वसाधारण)
साठी आरक्षित राहिला आहे.
या आरक्षणामुळे लांजा पंचायत समितीचे माजी उसभापती अनिल कसबले, माजी सभापती संजय नवाथे, काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष नुरुद्दिन सय्यद यांचे पत्ते कट झाल्याने त्यांच्या पदरी निराशा आली आहे तर माजी सभापती दिपाली दळवी, मानसी आंबेकर,युवराज हांदे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक महेश खामकर यांचेसाठी हे आरक्षण फायद्याचे राहिले आहे. त्यांना पुन्हा एकदा लॉटरी लागली असल्याचे बोलले जात आहे.