सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी तालुक्यातील दाणोली येथील श्री समर्थ साटम महाराज वाचनालयाच्या वतीने भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीचे औचित्य साधून १५ ऑक्टोबर २०२५ रोजी ‘वाचन प्रेरणा दिन’ विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने “ग्रंथ प्रदर्शन”, “मी वाचलेले पुस्तक” आणि “तुम्ही वाचा मुले वाचतील” या अभिनव उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
वाचनालयाच्या सभागृहात सकाळी १०.०० वाजता आयोजित या कार्यक्रमासाठी कोकण मराठी साहित्य परिषदेचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष कवी दीपक पटेकर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. व्यासपीठावर वाचनालयाचे अध्यक्ष तथा साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य श्री भरत गावडे, माजी सैनिक सहदेव राऊळ, सचिव ॲड. एल. डी. सावंत, उपाध्यक्ष भास्कर परब, गिरीधर चव्हाण, माजी सरपंच संजय लाड, समीर शिंदे, डॉ. विठ्ठल सावंत आणि विलास जंगले आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाचनालयाचे अध्यक्ष भरत गावडे यांनी केले. त्यांनी ग्रंथालयाच्या उपक्रमांची माहिती देऊन वाचनाचे महत्त्व विषद केले, तसेच भविष्यातील वाटचालीसंदर्भात कल्पना मांडल्या. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून मुख्य कार्यक्रमाची सुरुवात झाली. यानंतर प्रमुख पाहुणे कवी दीपक पटेकर यांच्या हस्ते फित कापून ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. विशेष म्हणजे, या प्रदर्शनात डॉ. बी. डी. पाटील यांच्या सहकार्याने वाचनालयास मिळालेल्या सुमारे ₹. ५०००/- किंमतीच्या प्रसिद्ध निसर्गप्रेमी अभ्यासक मारुती चितमपल्ली आणि खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांच्या पुस्तकांचा समावेश होता.
यावेळी मार्गदर्शन करताना प्रमुख पाहुणे दीपक पटेकर यांनी वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यामागचा उद्देश स्पष्ट केला. मुलांना बालपणात मोबाईल किंवा टीव्हीवरील कार्टूनमध्ये गुंतवून न ठेवता त्यांना प्राणी-पक्ष्यांची चित्रे असलेली पुस्तके, तसेच वाचनीय पुस्तके देऊन वाचनाची गोडी लावली पाहिजे, असा सल्ला त्यांनी दिला. केवळ दुसऱ्याकडे पाहून अधिकारी होता येत नाही, तर अधिकारी होण्यासाठी कठोर परिश्रमातून ज्ञान आत्मसात करावे लागते आणि त्यासाठी अवांतर वाचनाची सवय महत्त्वाची आहे. वाचनामुळे लिखाणाची क्षमता वाढेल आणि मुलांचा बुद्ध्यांक वाढण्यास मदत होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमातील ‘मी वाचलेले पुस्तक’ हा उपक्रम उपस्थितांसाठी खास आकर्षण ठरला. या उपक्रमांतर्गत सौ. प्रगती परांजपे यांनी मारुती चितमपल्ली यांच्या ‘चैत्र पालवी’ या पुस्तकाचे अतिशय सुंदर रसग्रहण केले. भरत गावडे यांनी ‘जंगलांचं देणं’ या पुस्तकावर भाष्य केले. पवन केसरकर आणि भूषण मुजुमदार यांनी देखील त्यांच्या ओघवत्या शैलीत पुस्तकांचा परिचय करून दिला. विशेषतः, कु. काव्या परांजपे या चिमुकल्या मुलीने आपल्या गोड आवाजात पुस्तकावर भाष्य करून उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात दशक्रोशीतील शाळांमध्ये नव्याने दाखल झालेल्या शिक्षकांचे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ग्रंथ भेट देऊन स्वागत करण्यात आले.
डॉ. विठ्ठल सावंत यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाला श्रीम. मधुवंती गो. मेस्त्री, श्रीम. जयश्री सु. कोरगावकर, श्रीम. किरण वि. केंगार यांच्यासह परिसरातील ग्रंथप्रेमी, वाचनप्रेमी शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.













