फोंडाघाट महाविद्यालयात ‘पत्रकारिता आणि रोजगाराच्या संधी’ या विषयावर पत्रकार प्रा. तुषार नेवरेकर यांचे मार्गदर्शन

मराठी विभाग व व्यवसाय मार्गदर्शन केंद्राचा उपक्रम

फोंडाघाट : कुमार नाडकर्णी –– कला आणि वाणिज्य महाविद्यालय, फोंडाघाट येथे मराठी विभाग व व्यवसाय मार्गदर्शन केंद्राच्या वतीने ‘पत्रकारिता आणि रोजगाराच्या संधी’ या विषयावर पत्रकार व वक्ते प्रा. तुषार नेवरेकर यांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाच्या प्रारंभी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पुरंदर नारे यांनी प्रा. तुषार नेवरेकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

 

 

त्यानंतर प्रा. नेवरेकर यांनी आपल्या व्याख्यानातून विद्यार्थ्यांना पत्रकारितेच्या विविध शाखांची माहिती दिली. त्यांनी मुद्रित माध्यम, इलेक्ट्रॉनिक मीडिया, डिजिटल प्लॅटफॉर्म तसेच सोशल मीडिया या सर्व क्षेत्रातील पत्रकारितेचे स्वरूप आणि त्या माध्यमातून निर्माण झालेल्या नव्या रोजगाराच्या संधींविषयी सविस्तर विवेचन केले.प्रा. नेवरेकर यांनी पत्रकारितेमध्ये असलेल्या सृजनशीलता, जबाबदारी आणि सामाजिक भान यावर विशेष प्रकाश टाकला. त्यांनी विद्यार्थ्यांना पत्रकारितेकडे केवळ नोकरी म्हणून नव्हे, तर समाज परिवर्तनाचे एक प्रभावी माध्यम म्हणून पाहण्याचे आवाहन केले.

 

 

 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पुरंदर नारे उपस्थित होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असल्याचे सांगून, देशाच्या घडणीत पत्रकारांचे मोलाचे योगदान अधोरेखित केले. तरुणांनी या क्षेत्राकडे वळून समाजकारण व लोकहित साधणारे कार्य करावे, तसेच या क्षेत्रात व्यवसाय आणि करिअरच्या विपुल संधी उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभाग व व्यवसाय मार्गदर्शन केंद्राचे प्रमुख डॉ. सतीश कामत यांनी केले. त्यांनी मराठी पत्रकारितेच्या समृद्ध परंपरेचा परामर्श घेत विद्यार्थ्यांना या क्षेत्राकडे व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहण्याचे आवाहन केले.कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन प्रा. बालाजी सुरवसे यांनी केले.कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन मराठी विभाग व व्यवसाय मार्गदर्शन केंद्राच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.