मंडणगड प्रतिनिधी : भारत सरकारच्या डी. एन. टी. आयोगाचे माजी अध्यक्ष व पद्मश्री दादा इदाते यांनी मंडणगड येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नूतन इमारतीस सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत श्री सदानंद रसाळ श्री. सदाशिव रसाळ, मुंडे महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. वाल्मिक परहर, उपप्राचार्य डॉ. विष्णु जायभाये उपस्थित होते. 12 ऑॅक्टोबर 1015 रोजी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश मा. श्री. भूषण गवई यांच्या हस्ते न्यायालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन करण्यात आले होते. भेटीचे निमीत्ताने पद्मश्री दादा इदाते यांनी सांगितले की, एकेकाळी सर्व अंगांनी दुर्लक्षित असलेला मंडणगड तालुका आज ख-या अर्थाने विकासाच्या दिशेने वाटचाल करताना दिसत आहे. ज्या तालुक्यामध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मूळगाव आहे, तिथे उच्च शिक्षणाची व न्यायदानाची सोय नसावी हे खरोखरच दुर्भाग्यपूर्ण होते. म्हणूनच 1996 मध्ये आपल्या संस्थेने लोकनेते गोपीनाथजी मुंडे महाविद्यालयाच्या रूपाने येथील उच्च शिक्षणाची उणीव दूर केली. डॉ. आंबेडकरांच्या आंबडवे या मूळगावी माध्यमिक शिक्षणाची उणीव दूर करण्यासाठी संस्थेने तेथे त्यांच्याच नावे माध्यमिक विद्यालय सुरू केले आहे. या ठिकाणी विद्यापीठ अनुदान आयोग, राज्य सरकार व मुंबई विद्यापीठाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने मॉडेल कॉलेज सुरू करून ख-या अर्थाने डॉ. बाबासाहेबांचे स्मारक उभारले आहे. आणि आज केंद्र व राज्य सरकारने भरघोस निधी उपलब्ध करून येथे दिवाणी व फौजदारी न्यायालयाची भव्य इमारत उभी करून येथील सामान्य नागरिकांची न्यायदानाची उणीव दूर केली आहे. शिक्षणाप्रमाणेच येथील नागरिक न्यायापासूनही दूर होते. या न्यायालयामुळे कमी खर्चात व कमी वेळेत त्यांना न्याय मिळू शकणार आहे. याबद्दल खरोखरच केंद्र व राज्य सरकारचे अभिनंदन केले पाहिजे.













