राजापूर (प्रतिनिधी): राजापूरात काँग्रेस पक्षाला धक्का बसला आहे. काँग्रेसचे राजापूर-लांजा, साखरपा विधानसभा युवक अध्यक्ष नूईद काझी यांनी आपल्या सहकाऱ्यांसह गुरुवारी शिवसेना मध्ये प्रवेश केला.
उद्योग मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत आणि लांजा-राजापूर-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत रत्नागिरी येथे पार पडला.
यावेळी नुईद काझी यांनी शिवसेना पक्ष हा विकासाभिमुख आणि जनतेच्या हितासाठी सदैव तत्पर असलेला पक्ष असून आमदार किरण सामंत यांच्या नेतृत्वाखाली मतदारसंघात होत असलेले काम पाहून आम्ही प्रभावित झालो आणि म्हणून शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले.
पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी या प्रवेशकर्त्यांचे स्वागत केले. राजापूर तालुक्यात शिवसेना मजबूत होत असून युवक वर्ग मोठ्या संख्येने पक्षात दाखल होत आहेत असे त्यांनी नमूद केले. याप्रसंगी उपाध्यक्ष नायब बांधीलकर, एजाज बांधीलकर, मेहबूब वागू, सनद काझी,सनत काजी, साहिल बांधिलकर यांच्यासह अनेक काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षाचा भगवा हाती घेतला आहे.
या कार्यक्रमाला माजी जि.प.सदस्य विलास चाळके, बंड्या साळवी, बाबू म्हाप, स्मितल पावसकर,शिवसेना राजापूर तालुका प्रमुख दीपक नागले,राजापूर आणि लांजा तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी, स्थानिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.













