सावंतवाडी । प्रतिनिधी :
क्रिडा व युवक सेवा संचालनालय आणि सिंधुदुर्ग जिल्हा क्रिडाधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत मुक्ताई ॲकेडमीच्या सावंतवाडी, कुडाळ आणि मालवण येथील विद्यार्थी-विदयार्थिनींनी अत्यंत उत्कृष्ट खेळ करत आपला ठसा उमटवला. गार्गी सावंत, साक्षी रामदुरकर, सई परुळेकर, चिदानंद रेडकर आणि वसंत गवस या पाच खेळाडूंची आता सातारा येथे होणाऱ्या विभागस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.
मुलींच्या गटातून गार्गी सावंत (१४ वर्षाखालील) हिने सहापैकी पाच राऊंड्स जिंकून तिसरा क्रमांक पटकावला. तर साक्षी रामदुरकर (१७ वर्षाखालील) हिने सहापैकी पाच राऊंड्स जिंकून दुसरा क्रमांक पटकावला. तसेच सई परुळेकर (१९ वर्षाखालील) हिने पाचपैकी चार राऊंड्स जिंकून चौथा क्रमांक पटकावला.
तर मुलांच्या गटातून वसंत गवस
(१७ वर्षाखालील) याने सहापैकी पाच राऊंड्स जिंकून तिसरा क्रमांक पटकावला. तसेच चिदानंद रेडकर (१९ वर्षाखालील) याने सहापैकी पाच राऊंड्स जिंकून दुसरा क्रमांक पटकावला.
विशेष म्हणजे, १७ वर्षाखालील गटातील पार्थ गावकर आणि वसंत गवस यांनी इंटरनॅशनल रेटेड खेळाडूंवर विजय मिळवून स्पर्धेत सनसनाटी निर्माण केली. या रेटेड खेळाडूंना त्यांनी स्पर्धेबाहेरचा रस्ता दाखवला.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय बुद्धिबळपटू बाळकृष्ण पेडणेकर आणि मुक्ताई ॲकेडमीचे अध्यक्ष श्री. कौस्तुभ पेडणेकर सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
मुक्ताई ॲकेडमीच्या या यशाबद्दल सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक श्रीनिवास नार्वेकर, तसेच सिरियल व चित्रपट कलाकार दिपक कदम, शशिकांत केरकर, अनिश म्हैसाळकर, ऋतिक भोईर यांसारख्या मान्यवरांनी ॲकेडमीला सदिच्छा भेट देऊन सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल विद्यार्थी आणि मार्गदर्शकांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.













