बेपत्ता झालेल्या मुलीचा अवघ्या २४ तासांत शोध घेत सुखरूप दिले नातेवाईकांच्या ताब्यात

राजापूर पोलिसांची यशस्वी कामगिरी

राजापूर प्रतिनिधी तालुक्यातील सौंदळ येथून नापत्ता झालेल्या २८वर्षीय मुलीचा अवघ्या २४ तासात शोध घेत राजापूर पोलीसांनी त्या मुलीला सुखरूप पालकांच्या हवाली केले आहे. राजापूर पोलीसांनी जलद गतीने केलेल्या या कार्यवाहीचे कौतुक होत आहे.
शबनम युसूफ पाटणकर (वय 28, रा. सौंदळ, मुसलमानवाडी, ता. राजापूर) ही दि. 25 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी 7 वाजता घरातून कुणालाही न सांगता निघून गेली होती. वडील युसूफ पाटणकर यांनी तिचा परिसरात आणि नातेवाईकांकडे शोध घेतला, मात्र ती न सापडल्याने त्यांनी राजापूर पोलीस ठाण्यात मुलगी नापत्ता झाल्याची तक्रार दाखल केली.
शबनम ही काही काळापासून मानसिक उपचार घेत आहे. नापत्ता झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी तिने एका महिलेच्या मोबाईलवरून घरी फोन करून ती गोवा येथे असल्याचे सांगितले आणि घरी यायचे असल्याची इच्छा व्यक्त केली. थोड्याच वेळाने पुन्हा दुसऱ्या मोबाईल क्रमांकावरून फोन करून ती पनवेलला जात असल्याचे आणि रेल्वेत बसल्याचे तीने सांगितले.
या माहितीवरून राजापूर पोलिसांनी तत्काळ तांत्रिक विश्लेषणाद्वारे कॉल डिटेल्स आणि गाडीचे लोकेशन तपासले. त्यानुसार राजापूर रोड रेल्वे स्टेशन येथे मांडवी एक्स्प्रेस आल्यावर पोलिस पथक आणि मुलीचे नातेवाईक यांनी सर्व बोग्यांची पाहणी केली. त्यावेळी नापत्ता शबनम पाटणकर रेल्वेत बसलेली आढळून आली. तिला सुखरूपपणे रेल्वेतून उतरवून तिच्या वडिलांच्या ताब्यात देण्यात आले. या जलद व समन्वयित कारवाईबद्दल राजापूर पोलिसांचे कौतुक होत आहे.
जिल्हा पोलीस अधिक्षक नितिन बगाटे, उपविभागिय पोलीस अधिकारी सुरेश कदम व राजापूर पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मोबीन शेख, पो.कॉ. घोगले, पो.कॉ. उकार्डे, पो.कॉ. शेलार, पो.कॉ.भेडसे, ले.पो.कॉ. वरक, होमगार्ड श्री तेली,श्री ताम्हनकर,श्री सकपाळे यांनी या शोध मोहिमेत सहभाग घेत या मुलीचा शोध घेतला.