जिल्ह्यात पक्षाला पुन्हा गत वैभव मिळवून देणार – नुरूद्दीन सय्यद
लांजा : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हातील काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून इच्छुकांची देखील मोठी संख्या आहे. त्यामुळे हे एकूण चित्र पाहता आगामी काळात काँग्रेस पक्षाला पुन्हा एकदा जिल्ह्यात नवसंजीवनी प्राप्त करून देणार असल्याचा विश्वास, काँग्रेसचे दक्षिण जिल्हाध्यक्ष नुरूद्दीन सय्यद यांनी व्यक्त केला .
स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायत, नगरपरिषदांच्या निवडणुका आगामी काही महिन्यात होऊ घातलेल्या आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कॉग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भेटी घेणे, त्यांच्याशी संवाद साधणे या उद्देशाने काँग्रेसचे दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष नुरुद्दीन
सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी, राजापूर लांजा या तीन तालुक्यांच्या बैठका नुकत्याच पार पडल्या. काँग्रेस पक्षाच्या त्या त्या ठिकाणच्या कार्यालयात या बैठका पार पडल्या. रत्नागिरी तालुक्याची बैठक काँग्रेस भवन रत्नागिरी या कार्यालयात पार पडली. यावेळी व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष नुरूद्दीन सय्यद यांच्यासह काँग्रेसचे जिल्हा प्रभारी रामचंद्र दळवी, प्रदेश सरचिटणीस साईनाथ चव्हाण आदी उपस्थित होते .
या बैठकीदरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून इच्छुकांची गर्दी पहावयास मिळाल्याचे नूरुद्दीन सय्यद यांनी सांगितले. निवडणुकांच्या निमित्ताने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून त्यामुळे आगामी काळात काँग्रेस पक्षाला पुन्हा एकदा गतवैभव प्राप्त होईल असे चित्र या निमित्ताने पहावयास मिळाल्याचे जिल्हाध्यक्ष सय्यद यांनी सांगितले .
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक या महाविकास आघाडी म्हणूनच लढवण्याचा कार्यकर्त्यांचा कल आहे .त्यामुळे कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या मागणीनुसारच आगामी निवडणूका या लढविण्यात येतील असेही जिल्हाध्यक्ष सय्यद म्हणाले. या सर्व निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या इच्छुक असलेल्या उमेदवारांचे अर्ज पक्ष कार्यालयाकडे द्यावेत पक्षाकडून च्या संदर्भात योग्य तो निर्णय घेतला जाईल असे सय्यद म्हणाले. दरम्यान एकूणच या निवडणुकांच्या निमित्ताने जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असल्याने नुरूद्दीन सय्यद यांनी समाधान व्यक्त केले
या सर्व बैठकांना त्या-त्या तालुक्यातील तालुकाध्यक्ष तसेच सर्व काँग्रेस पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.













