किल्ले सिंधुदुर्ग प्रवासी होडी सेवा व सागरी पर्यटन पुन्हा सुरु

समुद्रातील चक्रीवादळामुळे गेले दहा दिवस सागरी पर्यटन होते ठप्प

अमित खोत | मालवण: अरबी समुद्रातील चक्रीवादळामुळे किनारपट्टीवरील मासेमारी व सागरी पर्यटन गेले दहा दिवस ठप्प होते. आता समुद्रातील वादळ शांत झाले असून वातावरण पूर्वपदावर आले आहे. त्यामुळे बंदर विभागाकडून लावण्यात आलेला धोक्याचा तीन नंबर बावटा उतरविण्यात आला असून किल्ले सिंधुदुर्ग प्रवासी होडी सेवा व सागरी पर्यटन रविवार दोन नोव्हेंबर पासून सुरु झाले आहे. याबाबतची माहिती बंदर निरीक्षक रजनीकांत पाटील यांनी दिली आहे.

 

भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून प्राप्त माहितीनुसार महाराष्ट्र, गोवा किनारपट्टीवर सध्यस्थीत हवामान चांगले असल्यामुळे गेले दहा दिवस बंद असलेली सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी होडी वाहतूक, वॉटर स्पोर्ट्स, पॅरासिलिंग पर्यटन सेवा पुन्हा सुरु करण्यात आली आहे. अशी माहिती बंदर विभागाने दिली आहे.

 

दरवर्षी 1 सप्टेंबर पासून सागरी पर्यटन हंगामाची सुरुवात होते. दिवाळी सुट्टी कालावधी हा पर्यटन हंगामाचा प्रमुख कालावधी मानला जातो. मात्र, समुद्रातील वादळ स्थितीमुळे हा संपूर्ण दिवाळी हंगाम सागरी पर्यटनाच्या दृष्टीने ठप्प झाला. याचा मोठा परिणाम पर्यटन व्यवसायाला बसला आहे. वॉटर स्पोर्ट्स, पॅरासिलिंग, स्कुबा डायव्हिंग, किल्ले प्रवासी होडी वाहतूक, यासोबतच हॉटेल व्यवसाय क्षेत्रालाही अनेक बुकिंग रद्द झालेत. या कालावधीत पर्यटकांची रेलचेल थांबल्याने मोठा आर्थिक फटका मालवणच्या पर्यटन क्षेत्रासोबत अर्थ कारणाला बसला आहे. आता पुन्हा एकदा पर्यटनाची नवी सुरवात झाली आहे.