देवरूख (प्रतिनिधी)
शेतकऱ्यांनी शेतीकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला पाहिजे. शेती व्यवसाय हा कामगारांकडून न करता स्वतः केला पाहिजे. आपली संस्कृती ही कृषीशी निगडीत आहे. नाविण्यपूर्ण शेती करणे आवश्यक आहे. परिसंस्थेला बाधा न आणता शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन दापोली येथील बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डाँ. संजय भावे यांनी देवरूख येथे गुरूवारी केले.
संगमेश्वर तालुका कृषी अधिकारी कार्यालय, आणि अँग्रेस्टार शेतकरी कंपनी देवरूख यांच्या संयुक्त विद्यमाने देवरूख येथील पंचायत समितीच्या छत्रपती संभाजी महाराज सभागृहात गुरूवारी अश्वगंधा लागवड प्रशिक्षण शिबीर व कृषी प्रेरणासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डाँ. संजय भावे बोलत होते. यावेळी गटविकास अधिकारी आनंद लोकरे, ओंकार बेलोसे, निखिल कोळवणकर, हेमंत तांबे, श्री. शेलार आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना डाँ. भावे पुढे म्हणाले कि, आपल्याकडे २२ लाख मे.टन काजूवर प्रक्रिया करण्याची क्षमता आहे. तर भारतात ८ लाख मे.टन काजू आपण तयार करतो. उर्वरीत १४ लाख मे.टन काजू आपण आयात करतो. खाण्यासाठी २ लाख मे.टन काजू लागतो. तर एक लाख मे.टन काजूपासून तयार करणाऱ्या पदार्थासाठी लागत असल्याचे डाँ. भावे यांनी सांगितले.
शेतीमध्ये समस्या निर्माण करण्यासाठी शेतकरी जबाबदार आहे. जास्तीचे उत्पन्न घेण्यासाठी चुकीच्या पध्दतीने शेती केली जाते. त्यामुळे त्याचा परिणाम शेतीवर होतो. ज्या भागात शेती करण्यासाठी नांगरणी केली जात नाही त्याठिकाणी पाण्याची समस्या निर्माण होते. कारण नांगरणी केल्यामुळे पाणी जमिनीत मुरते आणि त्यामुळे पाण्याची पातळीत वाढ होते. अश्वगंधाची लागवड येथील शेतकऱ्यांनी केली पाहिजे. यामध्ये सर्वाधिक उत्पन्न मिळू शकते असेही ते म्हणाले. अश्वगंधा पीकासाठी हेक्टरी ६० हजार रूपयांचे अनुदान दिले जाणार आहे. दोन हेक्टरपर्यंत अनुदान दिले जाईल. अश्वगंधा हे पीक तालुक्याला वेगळी ओळख करून देणार पीक असल्याचे तालुका कृषी अधिकारी विनोद हेगडे यांनी सांगितले. तर अश्वगंधाचे तालुक्यात चांगले पीक येऊ शकते. आयुर्वेदात अश्वगंधाला खूप महत्व असल्याचे डाँ. संदीप कांबळे यांनी सांगितले. या प्रशिक्षण शिबीरात उपस्थित शेतकऱ्यांनी आपले प्रश्न विचारले. या प्रश्नांना डाँ. भावे यांनी समर्पक उत्तरे देत शेतकऱ्यांच्या सर्व शंकांचे निरसन केले. या शिबीराला तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.










