वडिलोपार्जित जमीन जागेच्या वादातून दोघा सख्ख्या चुलत भावांमध्ये हाणामारी

लांजा वैभव वसाहत येथील घटना, तिघांवर गुन्हा दाखल

लांजा : वडिलोपार्जित जमीन जागेच्या वादातून दोघा सख्ख्या चुलत भावांमध्ये शिवीगाळ तसेच हाणामारी झाल्याची घटना बुधवारी १२ नोव्हेंबर रोजी रात्री ९.२० वाजण्याच्या सुमारास लांजा शहरातील वैभव वसाहत येथे घडली आहे. याप्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी दाखल करण्यात आलेल्या असून पोलिसांनी एकूण तिघा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पृथ्वीराज प्रदीप मोरे (वय ३५, राहणार लांजा वैभव वसाहत) आणि राजीव अनिल मोरे (वय ४० राहणार वैभव वसाहत लांजा) हे एकमेकांचे सख्खे चुलत भाऊ असून त्यांच्यामध्ये गेल्या काही वर्षांपासून वडीलोपार्जित जमिनीच्या कारणावरून वाद सुरू आहेत. या घटनेत प्रकरणी ज्ञानदा पृथ्वीराज मोरे (वय २९) हिने लांजा पोलीस ठाण्यात केलेल्या तक्रारीनुसार त्यांचे पती आणि चुलत दिर यांच्यामध्ये वडिलोपार्जित जमिनीच्या कारणावरून वाद सुरू असून जमिनीच्या वाटपाबाबत तिचे चुलत सासरे अनिल लहू मोरे (वय ६५) यांनी लांजा न्यायालयात दावा दाखल केला आहे. त्याची नोटीस ज्ञानदा यांना प्राप्त झालेली आहे.‌
बुधवार दिनांक १२ नोव्हेंबर रोजी रात्र ९.२० वाजण्याच्या दरम्याने ज्ञानदा मोरे या आपल्या दहा महिन्यांच्या मुलासह घरी होत्या. यावेळी सख्खे
चुलत दिर आणि सासरे असलेले राजीव मोरे आणि अनिल मोरे यांनी तिच्या घरी जाऊन तुझा नवरा दुपारी आमच्याशी सामायिक जमिनीतील जनावरांच्या गोठ्यावरून भांडत होता, असे बोलून दिर राजीव मोरे याने तिला घाणेरडी शिवीगाळ केली. तू शिवीगाळ का करतोस असे तीने विचारणा केली असता राजीव याने ज्ञानदा हिला हाताने ढकलून दिले व‌ तिचे डाव्या हातावर मारहाण केली. याच दरम्याने तिचा नवरा पृथ्वीराज मोरे हा त्या ठिकाणी आला व पत्नीला सोडवण्यासाठी तो गेला असता अनिल मोरे यांनी त्याला लाकडी फळीने दोन्ही पायावर मारहाण केली. या घटनेत ज्ञानदा आणि तिचे पती पृथ्वीराज असे दोघेही जखमी झाले. त्यांनी केलेल्या फिर्यादीनुसार लांजा पोलिसांनी राजीव अनिल मोरे आणि अनिल लहू मोरे या दोघा विरोधात भारतीय न्याय संहिता २०२४ चे कलम ११८(१), भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ११५(२), भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३५२, आणि भारतीय न्याय संहिता २९२३ चे कलम ३५१(२) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
तर राजीव अनिल मोरे यांनी केलेल्या तक्रारीनुसार वडिलोपार्जित जमीन जागेच्या वादातून राजीव मोरे यांचे वडील अनिल मोरे यांनी पृथ्वीराज मोरे यांच्या वडिलांविरोधात न्यायालयात दावा दाखल केलेला असून त्याची नोटीस पृथ्वीराज यांच्या वडिलांना प्राप्त झाली आहे .त्याचा पृथ्वीराज याला राग घेऊन त्याने दिनांक १२ नोव्हेंबर रोजी दुपारी ४.३० वाजण्याच्या दरम्याने राजीव मोरे यांच्या आई वडिलांना शिवीगाळ करून हाताने थोपटाने मारहाण केली. याप्रकरणी राजीव मोरे यांच्या वडिलांनी लांजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्याचा राग आल्याने पृथ्वीराज याने रात्रो ९.२० वाजण्याच्या दरम्याने फिर्यादी राजीव मोरे व त्यांच्या वडिलांना शिवीगाळ करून काठीने तसेच हाताच्या थापटाने मारहाण करून दुखापत केली. तसेच पुढील दोन दिवसात तुम्हाला ठार मारन टाकतो, अशी धमकी दिली. या प्रकरणी राजीव मोरे यांनी लांजा पोलीस ठाण्यात केलेल्या तक्रारीनुसार लांजा पोलिसांनी पृथ्वीराज प्रदीप मोरे यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ११८(१), भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ११५(२), भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३५२, आणि भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३५१(२) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
या घटने प्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल राजेंद्र कांबळे हे करत आहेत.