२० नगर सेवक पदासाठी ६९ अर्ज दाखल; मंगळवारी १८ रोजी होणार छाननी
राजापूर (वार्ताहर): राजापूर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सोमवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांनी एकच गर्दी केली होती. सोमवार अखेर महायुती व महाविकास आघाडीसह अपक्ष अशा राजापूर नगर परिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षपदासाठी पाच उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. तर १० प्रभागातील २० नगरसेवकपदांच्या जागांसाठी एकुण ६५ उमेदवारांचे ६९ अर्ज दाखल झाले आहेत.
राजापूर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची सोमवार १७ नोव्हेंबर ही शेवटची मुदत होती. दि. १० नोव्हेंबर पासून अर्ज दाखल करण्याची प्रकिया सुरू झाली होती. मात्र राजकीय पक्षांनी सोमवारी अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी केली.
महायुती व महाविकास आघाडीने आपल्या लोकनियुक्त नगराध्यक्षपदासह सर्व नगरसेवक पदाचे अर्ज दाखल केले. यामध्ये महायुतीकडून नगराध्यक्षपदासाठी सौ. श्रृती ताम्हनकर, महाविकास आघाडीकडुन एड. सौ. हुस्नबानू खलिफे यांनी आपले अर्ज दाखल केले. तर नगराध्यपदासाठी अपक्ष म्हणून भाजपाच्या महिला आघाडीच्या सौ. शितल पटेल यांनी तर सौ. जान्हवी करंगुटकर यांनी अर्ज दाखल केले. तर यापुर्वी हिंदु महासभेच्या वतीने सौ. ज्योती खटावकर यांनी आपला अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे असे नगराध्यक्ष पदासाठी एकुण पाच उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत.
तसेच नगरसेवक पदासाठी १० प्रभागात असलेल्या २० जागांसाठी एकुण ६५ उमेदवारांनी ६९ अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये महायुती व महाविकास आघाडीच्या ४० उमेदवारांसह २५ अपक्ष उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. सायंकाळी उशीरापर्यंत प्रशासनाकडून ही प्रक्रिया सुरू होती.
सोमवारी सकाळपासूनच उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांनी गर्दी केली होती. दुपारी ३ वाजेपर्यंत नगर परिषदेत दाखल झालेल्या सर्व उमेदवारांचे अर्ज स्विकारून त्यांना टोकन देण्यात आले. व सायंकाळी ६ वाजेपर्यंत या सर्व उमेदवारांचे अर्ज पुर्तता करून घेण्यात आले.
या निवडणूक प्रक्रीयेसाठी निवडणूक निर्णय अधिकारी विकास गंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. निवडणूक निर्णय अधिकारी जयंत जावडेकर, निवासी नायब तहसिलदार विलास सरफरे, महसुल नायब तहसिलदार श्रीमती सायली गुरव, मृणालिनी शेळके, नगर परिषदेचे कार्यालयीन अधिक्षक जितेंद्र जाधव, सहा. महसुल अधिकारी मंगेश परांजपे, बाजीराव पाटील, विकास पिठलेकर, संदीप कोकरे, सुरेश डकरे, रोहन कुंभार, अनुष्का जुवेकर आदी अधिकारी व कर्मचारी परिश्रम घेत आहेत.
राजापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. या करिता प्राप्त अर्जांची छाननी १८ नोव्हेंबर रोजी होणार आहे. अर्ज माघारी घेण्याची मुदत २१ नोव्हेंबर पर्यंत असून, निवडणूक चिन्हांचे वाटप २६ नोव्हेंबर रोजी होणार आहे.











