मतदारांशी थेट संवाद : भाजपला विजयाचा विश्वास!
सावंतवाडी: आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांनी भटवाडी प्रभाग क्रमांक १ मध्ये आपल्या प्रचारफेरीदरम्यान मतदारांचे लक्ष वेधून घेणारा ‘हटके’ प्रचार केला. यावेळी स्थानिक मतदारांशी संवाद साधताना त्यांनी सावंतवाडीच्या विकासाचे व्हिजन मांडले.
‘हटके’ प्रचार स्टाईलने वेधले लक्ष
भटवाडी प्रभाग क्रमांक १ मधील प्रचारामध्ये भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारलेला दिसला. भाजपचे कार्यकर्ते दीपेश शिंदे यांनी आपल्या खास स्टाईलने मतदारांचे लक्ष वेधून घेतले. या प्रचारफेरीत नगराध्यक्षपदाच्या उमेदवार श्रद्धाराजे भोंसले यांच्यासह युवराज लखमराजे भोंसले हे देखील सहभागी झाले होते.
प्रभाग क्रमांक १ मध्ये भाजपचे उमेदवार, माजी नगरसेवक राजू बेग आणि दिपाली भालेकर यांनी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. या प्रचारफेरीला चांगला प्रतिसाद मिळाला.
यावेळी व्यासपीठावर नगराध्यक्षपदाच्या उमेदवार युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले, युवराज लखमराजे भोंसले, उमेदवार राजू बेग, दिपाली भालेकर, संदिप नेमळेकर, मिसबा शेख आदींसह भाजपचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘सावंतवाडीत विजय निश्चित’ – राजू बेग
प्रचारसभेत बोलताना प्रभाग क्रमांक १ मधील उमेदवार राजू बेग यांनी भाजपच्या विजयाबद्दल ठाम विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले, “सावंतवाडी हे राजघराण्याचे आहे. त्यामुळे नगराध्यक्षपदाच्या उमेदवार श्रद्धाराजे भोंसले यांच्यासह भाजपचे सर्व उमेदवार निश्चितपणे विजयी होतील.” या विश्वासाने त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये नवा जोश निर्माण केला.












