तिघांविरोधात गुन्हा दाखल
मंडणगड : येथील बाणकोट रोडवर रविवार, दिनांक २३ नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास एका नामकरण सोहळ्यादरम्यान दीपक रामचंद्र साळुंखे ( रा. देव्हारे, मंडणगड) या युवकावर त्याच्या ओळखीच्या तीन व्यक्तींनी विनाकारण वाद घालून जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दीपक साळुंखे हे त्यांची चुलत बहीण हिच्या मुलीच्या नामकरण सोहळ्यासाठी बाणकोट रोड, मंडणगड येथे हजर होते. याच वेळी दीपक यांच्या ओळखीचे रोहिदास तुळशीराम पवार, अक्षय रोहिदास पवार, आणि पप्पू तुळशीराम पवार यांनी नाहक दीपक साळुंखे यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यावेळी अक्षय रोहिदास पवार याने कोणत्याही लोखंडी धारदार शस्त्राने दीपक साळुंखे यांच्यावर वार केला, ज्यामुळे त्यांच्या डोक्यावर गंभीर दुखापत झाली.
या घटनेनंतर गंभीर जखमी झालेल्या दीपक साळुंखे यांनी सोमवार, दिनांक २४ नोव्हेंबर २०२५ रोजी पहाटे ३.०२ वाजता मंडणगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी रोहिदास तुळशीराम पवार, अक्षय रोहिदास पवार आणि पप्पू तुळशीराम पवार या तिघांविरोधात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास मंडणगड पोलीस प्रशासन करत आहे.












