कोकणी माणसाचं आणि शिवसेनेचे अतूट नातं : ना. एकनाथ शिंदे

शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही 

सिंधुरत्न योजना पुन्हा सुरु होण्यासाठी प्रयत्न करणार 

सावंतवाडी । प्रतिनिधी : कोकणी माणसाचं आणि शिवसेनेचे अतूट नातं आहे. कोकणातील जनेतेने शिवसेनेला भरभरून दिलं आहे. ‘जय महाराष्ट्र ‘ ही घोषणा कोकणातून आली. स्वर्गीय बाळासाहेबांनी देखील कोकणावर कोकणाने त्यांच्यावर खूप प्रेम केलं. कोकणातील माणसं साधीभोळी. पण एकदा त्यांनी निश्चय केला की ती दूर हटत नाही. येथील जनतेला विकास हवा आहे व विकासासाठी काहीही कमी पडू देणार नाही, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

सावंतवाडी नगरपरिषद निवडणूकीच्या पाश्वभूमीवर सावंतवाडी येथील गांधी चौक येथे आयोजित शिवसेनेच्या जाहिर सभेत ते बोलत होते. यावेळी उद्योगमंत्री ना. उदय सामंत, आ. दीपक केसरकर, पक्ष निरीक्षक राजेश मोरे, जिल्हाप्रमुख संजू परब, महिला जिल्हा प्रमुख तथा नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार ॲड. निता कविटकर, तालुका प्रमुख दिनेश गावडे, बबन राणे, शहरप्रमुख बाबू कुडतरकर, माजी जिल्हा प्रमुख अशोक दळवी, माजी नगराध्यक्षा अनारोजिन लोबो आदी उपस्थित होते.

ते म्हणाले, आम्ही विचारांची लढाई विचाराने लढतो. त्यामुळे बाळासाहेबांचे विचार जेव्हा पायदळी तुडवले गेले. तेव्हा आम्ही उठाव केला व सत्तेतून बाजूला झालो. त्यानंतर पुन्हा जनतेने आमच्यावर विश्वास ठेवला. सावंतवाडीकरांनीही आमच्यावर विश्वास ठेवावा, आम्हाला साथ द्यावी, शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

मला सभेला यायला उशीर झाला तरी लाडक्या बहिणी थांबून राहतात. लाडक्या भावाच्या मागे राहतात. ज्या उमेदवारांच्या मागे महिला मतपेटीत त्यांचा नंबर पहिला. लाडकी बहिण योजना कोणीही बंद करु शकणार नाही. ही योजना सर्वसामान्य भगिनींना आर्थिक आधार देणारी आहे. लेक लाडकी योजना केली. एसटी सवलत दिली. अनेक लोकाभिमुख योजना आणल्या. सावंतवाडीतही अनेक प्रकल्पांना निधी दिला, असे त्यांनी सांगितले.

अडीज वर्षे मुख्यमंत्री पदाच्या काळात मी संपूर्ण महाराष्ट्रात फिरत होतो. लोकं मला विचारायचे तुम्ही झोप कधी घेता पण मी सांगायचो मी झोपा काढायला नाही तर काम करायला आलो आहे. अनेक योजना आणल्या.

मुख्यमंत्री असताना मी सीएम म्हणजे कॉमन मॅन म्हणायचो तर उपमुख्यमंत्री म्हणजे डेडिकेडेट फॉर कॉमन मॅन असून मी जनतेसाठी समर्पित आहे. खूर्ची हा आमचा अजेंडा नाही. काम हा आमचा अजेंडा आहे.

मी मुख्यमंत्री असताना एका इंजिनिअरींगचे शिक्षण घेणाऱ्या मुलीने आत्महत्या केली. ५० टक्के फी भरु न शकल्याने आत्महत्या केली त्याच्या वेदना झाल्या. १०० टक्के फी शासनाने भरण्याचा निर्णय घेतला. आज उद्योगामध्ये आपण एक नंबरला आहेत जीडीपी मध्ये एक नंबरला आहोत. आपल्याला सावंतवाडीला देखील नंबर एकला आणायचं आहे.

सिंधुरत्न योजना पुन्हा सुरु होण्यासाठी प्रयत्न करणार. मुंबई सिंधुदुर्ग ग्रीनफील्ड रस्ता करत आहोत. त्या महामार्गामुळे वेळ अर्ध्याने कमी होईल. मात्र, स्थानिकांना विश्वासात घेऊनच ते निर्णय घेतले जातील असेही त्यांनी स्पष्ट केले.

आजची ही नगर परिषदेची निवडणूक जरी छोटी असली तरी ही निवडणूक सावंतवाडीच भवितव्य घडवणारी आहे. तुमचं जीवन समृद्ध करणारी आहे. मी नगर विकास खात्याचा मंत्री आहे. त्यामुळे नगरविकासाकडे जे जे प्रस्ताव येतील ते सर्व प्रस्ताव मंजूर करणार. विकासाला लागतील तेवढे पैसे देणार. तुम्हाला निधीची कमतरता भासू देणार नाही. फक्त आम्हाला साथ द्या, आम्ही तुमच्या सोबत कायम राहू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी आमदार दीपक केसरकर म्हणाले, सावंतवाडीतील जनतेने मला नेहमीच प्रेम दिले आहेत. मला चार वेळा आमदार म्हणून निवडून दिले. माझ्या या चारही विजयांमध्ये सावंतवाडी शहराचा नेहमीच मोठा वाटा राहिला आहे. कारण या शहराला मी आपलं घर मानतो. त्यामुळे या निवडणुकीत देखील मला व माझ्या सहकाऱ्यांना साथ द्या, असे आवाहन माजी शालेय शिक्षण मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी केले.

ते म्हणाले, सावंतवाडी पूर्वी कशी होती आणि आता कशी आहे हे तुम्हाला ज्ञात आहे. जनरल जगन्नाथराव भोसले उद्यानाच्या ठिकाणी छोटास मैदान होतं तेथे मुलं क्रिकेट खेळायची. आता तिथे उद्यान झालं आहे. बॅरिस्टर नाथ पै, सभागृह, शिल्पग्राम असे अनेक प्रकल्प आम्ही राबविले. संत गाडगेबाबा मंडई तसेच जिमखाना मैदानासारख्या काही प्रकल्पांचे काम सुरू आहे. ती कामे देखील लवकरच पूर्ण होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मोती तलावावर खटला चालू आहे. तो खटला मागे घेण्यात यावा. मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या बाबत देखील काही सह्या झालेल्या नसल्यामुळे तो प्रकल्प रखडला आहे. भविष्यात त्या सया न झाल्यामुळे प्रकल्प रखडल्यास प्रसंगी न्यायालयात जाऊ असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला.

यावेळी जिल्हाप्रमुख संजू परब, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार ॲड. निता कविटकर यांनीही आपले विचार मांडले. सभेचे सूत्रसंचालन प्रेमानंद देसाई यांनी केले यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.