मंडणगड : मान्सुनचा मुक्काम वाढल्याने केवळ ऑक्टोबर महिन्यात तालुक्यात खरीप हंगामातील भात, नाचणी, वरी इत्यादी पिकाखालील एकूण ३३४.५६ इतके क्षेत्र बाधीत झाले १६०० शेतकऱ्यांचे विविध पिकांचे नुकसान झालेले असल्याचे पंचनामे कृषी व महसुल विभागाने पुर्ण केले आहेत.
यंत्रणेने निर्धारीत केलेल्या नुकसान भरपाईच्या २९ लाख ६९ हजार ६५ रुपये इतका मदत निधी अद्याप प्रतिक्षाधीन आहे. खरीप हंगामात जुन ते सप्टेंबर २०२५ या चार महिन्यांचे कालावधीत तालुक्यातील १४४ शेतकऱ्यांचे ४९.२२ हेक्टर इतक्या क्षेत्रातील विविध पिकांचे नुकसान झाले होते, त्याकरिता ३ लाख ७५ हजार रुपये इतक्या नुकसान निधीचे वाटप करण्यात आले आहे. याच कालवधीत तालुक्यातील घरे व गोठ्यांचे नुकसान झाल्याने क्षतीग्रस्त झालेली २२ प्रकरणे होती. या करिता २ लाख ५० हजार रुपये इतक्या निधीचे वाटप करण्यात आले. पशुधनाचे नुकसान झाल्याने ६९ हजार ५०० रुपये इतक्या मदत निधीचे वाटप करण्यात आल्याची माहिती तहसिल कार्यालय मंडणगड यांचेकडून प्राप्त झाली आहे. तालुक्यातील शेतकऱ्याचें जमीन धारण क्षमता हेक्टरी नसल्याने नुकसान भरपाई निधीचे वाटपात अडचणी आल्या. जमीन क्षेत्र कमी असल्याने १ गुंठा नुकसान झालेले शेतकरी व ११ गुंठे नुकसान झालेले शेतकरी या समान निधी मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे.










