खेड : रंगोत्सव सेलिब्रेशन, मुंबई यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय रंगोत्सव चित्रकला स्पर्धेत ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूल (CBSE) मोरवंडे–बोरज येथील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करीत मानाचा ठसा उमटवला आहे. या स्पर्धेत राज्यभरातून एकूण ५१६ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. त्यामध्ये ज्ञानदीप विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेच्या आणि कलेच्या बळावर बहुमानास्पद अशी आघाडी मिळवली.
या स्पर्धेत कु. प्रवेश विपिन दुबे यांनी प्रथम क्रमांक पटकावत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. कु. राधा निलेश गांधी हिने द्वितीय क्रमांक मिळवला. तसेच कु. स्मृती कालू भौमिक आणि कु. सत्यजित बाबासाहेब सानप या विद्यार्थ्यांनी विशेष बक्षीस मिळवून विद्यालयाचा गौरव वाढवला. याशिवाय ५५ विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल, ४० विद्यार्थ्यांना सिल्वर मेडल, २० विद्यार्थ्यांना ब्राँझ मेडल तर ६ विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांची आंतरराष्ट्रीय रंगोत्सव स्पर्धेसाठी निवड झाल्याची आनंददायी माहिती शाळेच्या प्रशासनाकडून देण्यात आली. विद्यार्थ्यांच्या या यशामागे कलाशिक्षक श्री. अभिजीत मनवे आणि श्री. अविनाश चौगुले यांचे सक्षम मार्गदर्शन लाभले. तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री. भरत मोरे यांनी विद्यार्थ्यांना सतत प्रोत्साहन देऊन त्यांची कलागुणांची जडणघडण अधिक सक्षम केली.
या कार्यक्रमाला शाळेचे प्राचार्य मा. श्री. भरत मोरे, संस्थेचे सरचिटणीस श्री. माधव पेठे, सर्व शिक्षक–शिक्षकेतर कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.













