मायनिंग कंपनीच्या ओव्हरलोड डंपरमुळे मांदिवलीतील घरांना तडे;

 नागरिक भयभीत, प्रशासनाचे दुर्लक्ष

दापोली (विशेष प्रतिनिधी) – मांदिवली (ता. दापोली) येथे उंबरशेत आणि रोवले परिसरातील मायनिंग कंपनीकडून सुरू असलेल्या ओव्हरलोड डंपर वाहतुकीमुळे गावातील नागरिकांच्या घरांना तडे जात असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. विशेषतः मांदिवलीतील रहिवासी अब्दुल कादिर अफजल्ला बांगी यांच्या घराला मोठ्या प्रमाणात तडे गेले असून, घराच्या सुरक्षिततेबाबत कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दररोज मोठ्या संख्येने क्षमतेपेक्षा अधिक भार घेऊन जाणारे डंपर भरधाव वेगाने गावातून ये-जा करत असल्याने प्रचंड कंपन निर्माण होत आहे. या कंपनांचा थेट परिणाम घरांच्या भिंतींवर होत असून अनेक घरांमध्ये भेगा पडू लागल्या आहेत. रात्रीच्या वेळीही ही वाहतूक सुरू राहत असल्याने नागरिकांच्या झोपेवर आणि दैनंदिन जीवनावरही विपरीत परिणाम होत आहे.
या गंभीर प्रकाराबाबत ग्रामस्थांनी वारंवार संबंधित प्रशासनाकडे आणि अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या आहेत. मात्र तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. ओव्हरलोड वाहतुकीवर नियंत्रण ठेवणे, वेगमर्यादा लागू करणे आणि दोषी मायनिंग कंपनीवर कारवाई करणे अपेक्षित असताना प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याची भावना ग्रामस्थांमध्ये वाढत आहे. जर लवकरात लवकर या ओव्हरलोड डंपर वाहतुकीवर कारवाई झाली नाही तर भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा इशारा मांदिवलीतील नागरिक देत आहेत. प्रशासनाने तातडीने दखल घेऊन नागरिकांच्या जीवित व मालमत्तेचे संरक्षण करावे, अशी जोरदार मागणी स्थानिकांकडून होत आहे.