प्रति मशिन दररोज तीन सेशन पूर्ण करणारे राज्यातील एकमेव केंद्र
ना. नितेश राणे यांच्या वैद्यकीय सुविधा देण्याच्या प्रयत्नाला यश
देवगड प्रतिनिधी
जिल्ह्यातील विविध आरोग्य संस्थांमधील इनहाऊस डायलेसीस युनिटचा नोव्हेंबर २०२५ चा आढावा घेतला असता, ग्रामीण रुग्णालय, देवगड येथील डायलेसीस युनिटने उल्लेखनीय कामगिरी केल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रति दिन प्रति मशिन तीन डायलेसीस सेशन पूर्ण करणारे देवगड हे राज्यातील एकमेव ग्रामीण रुग्णालय ठरले असून, जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाकडून देवगड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक प्रकाश पाटोदेकर व देवगडच्या डायलेसीस तंत्रज्ञ व अधिपरिचारिकांचे अधिकृतपणे अभिनंदन करण्यात आले आहे. ही मशीन व त्याचा कर्मचारी वर्ग याबाबत सातत्याने पालकमंत्री व स्थानिक आमदार म्हणून नामदार नितेश राणे यांनी लक्ष दिल्याने हा कक्ष कार्यान्वित राहिला आहे.
जिल्हा शल्यचिकित्सक, सिंधुदुर्ग यांनी काढलेल्या पत्रानुसार, जिल्ह्यातील इतर रुग्णालयांमध्ये अपेक्षित असलेल्या सेशनच्या तुलनेत प्रत्यक्षात कमी डायलेसीस सेशन झालेले दिसून आले. मात्र, देवगड ग्रामीण रुग्णालयात उपलब्ध असलेल्या दोन डायलेसीस मशिनवर दररोज प्रत्येकी तीन सेशन यशस्वीरित्या पार पाडण्यात आले. नोव्हेंबर २०२५ या महिन्यात देवगड येथे एकूण १४६ डायलेसीस सेशन झाले असून अपेक्षित १५० सेशनच्या जवळपास पोहोचणारी ही कामगिरी आरोग्य यंत्रणेसाठी प्रेरणादायी ठरली आहे.
जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने स्पष्ट केले आहे की, राज्यात सध्या देवगड हे एकमेव डायलेसीस युनिट आहे जिथे प्रति मशिन दररोज तीन सेशन नियमितपणे होत आहेत. त्यामुळे देवगड ग्रामीण रुग्णालयातील डायलेसीस सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचे विशेष कौतुक करण्यात आले आहे.
दरम्यान, इतर उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयांना देखील देवगडच्या कामगिरीचा आदर्श घेऊन अतिरिक्त शिफ्ट वाढवणे, मशिन दुरुस्ती तात्काळ करणे, रुग्ण नोंदणी पीएमएनडीपी पोर्टलवर रिअल टाइम करणे यासह विविध सूचना देण्यात आल्या आहेत.
देवगड ग्रामीण रुग्णालयाने केलेली ही कामगिरी किडनी रुग्णांसाठी दिलासादायक ठरत असून जिल्ह्याच्या आरोग्य सेवेचा दर्जा उंचावणारी असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.












