मानसिक व लैंगिक आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दुबईत दखल;

रत्नागिरीच्या डॉ. अतुल ढगे यांना आंतरराष्ट्रीय सन्मान

रत्नागिरी : मानसिक व लैंगिक आरोग्य या संवेदनशील पण अत्यंत महत्त्वाच्या क्षेत्रात दीर्घकाळ सातत्याने केलेल्या सामाजिक, उपचारात्मक व जनजागृतीपर कार्याची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेत रत्नागिरी येथील प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ व लैंगिकतज्ज्ञ, माईंड केअर हॉस्पिटलचे संस्थापक डॉ. अतुल ढगे यांना ‘Global Leader in Mental & Sexual Health Awareness – 2025’ हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला .

हा सन्मान Saksham International Business Awards 2025 अंतर्गत दुबई (UAE) येथील हॉटेल अल खोरी स्काय गार्डन येथे झालेल्या भव्य समारंभात देण्यात आला. या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या Global Academic Forum (GAF), United States यांच्या अध्यक्ष रेबेका जे. डाल होत्या, त्यांच्या हस्ते डॉ. ढगे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला .

डॉ. अतुल ढगे यांनी मानसिक आरोग्याविषयी असलेले गैरसमज, भीती व सामाजिक कलंक दूर करण्यासाठी अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम राबवले आहेत. Mindcare Marathon, माईंडकेअर एक्स्प्रेस, जागर मनोआरोग्याचा, मनोमित्र कार्यशाळा तसेच कोविड काळातील ‘Sukoon’ कार्यक्रम यांसारख्या उपक्रमांमुळे समाजात मानसिक आरोग्याविषयी सकारात्मक संवाद निर्माण झाला आहे. ‘Remove Stigma Campaign’च्या माध्यमातून त्यांनी तरुण, विद्यार्थी, पालक आणि सर्वसामान्य नागरिकांपर्यंत जागरूकतेचा संदेश प्रभावीपणे पोहोचवला आहे .

मानसिक व लैंगिक आरोग्यावर डॉ. ढगे यांनी १००० पेक्षा अधिक लेख विविध वृत्तपत्रांमध्ये लिहिले असून मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेत शेकडो व्याख्याने आणि जनजागृती उपक्रमांद्वारे ते सातत्याने सामाजिक बांधिलकी जपत आहेत. NIMHANS, बेंगळुरू येथील Professional Skills & Leadership Training (2014) साठी आशियातील निवडक १७ तज्ज्ञांमध्ये त्यांची निवड झाली होती. यापूर्वी नवी दिल्ली येथे त्यांना ‘Most Trusted Psychiatrist & Sexologist – 2024’ हा सन्मानही प्राप्त झाला आहे .

लैंगिक आरोग्याबाबत गोपनीय व वैज्ञानिक उपचारांची गरज ओळखून त्यांनी ‘Red Apple Sexual Wellness Clinic’ ही भारतातील पहिली discreet sexual wellness service सुरू केली. या आंतरराष्ट्रीय सन्मानाबद्दल भावना व्यक्त करताना डॉ. ढगे म्हणाले की, ही मान्यता त्यांच्या रुग्णांची, माईंड केअर टीमची आणि समाजाच्या विश्वासाची असून, यापुढे अधिक जबाबदारीने व निष्ठेने काम करण्याची प्रेरणा या पुरस्कारामुळे मिळाल्याचे त्यांनी नमूद केले आहे .