श्री स्वामी चैतन्य परिवार आयोजित कीर्तनमाला – २०२६ तयारी सुरू

पाच दिवसीय कीर्तनमालेत
पेशवाईचा सुवर्णकाळ उलगडणार

१२ जानेवारी पासुन प्रारंभ

चिपळूण : श्री स्वामी चैतन्य परिवार आयोजित जानेवारी २०२६ मधील कीर्तनमाला तयारीचा शुभारंभ आयोजक परिवाराचे श्रद्धास्थान असलेले सद्गुरू निवास व शहरातील आराध्य दैवतांना निमंत्रण देऊन करण्यात आला.
इंग्रजी नववर्षाचा प्रारंभ करणारा जानेवारी महिना , चिपळूण व कीर्तनमाला असं समीकरण गेली नऊ वर्षे दृढ झाले आहे. आयोजक श्री स्वामी चैतन्य परिवाराचे नेटके संयोजन यामुळे रसिक मान्य झालेली ” कीर्तनमालेचे ” येते दहावे वर्ष आहे. सोमवार दिनांक १२ जानेवारी ते शुक्रवार दिनांक १६ जानेवारी २०२६ या कालावधीतील आयोजित दहाव्या कीर्तनमाला पुष्पाचा विषय आहे …’पेशवाईचा सुवर्णकाळ’ .
गेली नऊ वर्षे रसिकांचे भरभरून प्रेम लाभलेली कीर्तनमाला शहरातील चिपळूण शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र येथे होणार आहे. दर दिवशी सायंकाळी ६.३० ते रात्रौ ९.३० या कालावधीत आयोजित कीर्तनमालेचे उदघाटन सोमवार दिनांक १२ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ६.०० वाजता संत साहित्याचे गाढे अभ्यासक श्री. धनंजय चितळे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
या कीर्तनमालेचे वैशिष्ट्य म्हणजे राष्ट्रीय कीर्तनकार , विद्यावाचस्पती
ह.भ.प. चारूदत्त आफळे यांच्या अमोघ वाणीला सुश्राव्य संगीत साथीदारांची नेटकी साथ असते. दरवर्षी ओढ लावणारा श्रवणीय कीर्तनाचा हा जागर रसिकांसाठी पर्वणी असतो. विषयाला साजेसे रंगमंच नेपथ्य , अनुरूप असणारी वातावरण निर्मिती व विनामूल्य प्रवेश यामुळे श्री स्वामी चैतन्य परिवाराची ही कीर्तनमाला गेली नऊ वर्षे स्मरणीय ठरत आली आहे.
चिपळूण बापट आळी येथील श्री स्वामी समर्थ महाराज यांचे निस्सीम उपासक परमपूज्य श्री गुरूमाऊली सद्गुरू वासुदेव दळवीकाकामहाराज यांचा आशीर्वाद लाभलेल्या या कीर्तनमालेत ऐतिहासिक वारसा लाभलेल्या भारतीय संस्कृतीच्या इतिहासाचे पैलू राष्ट्रीय कीर्तनकार विद्यावाचस्पती ह.भ.प. श्री. चारूदत्तबुवा आफळे आपल्या अभ्यासपूर्ण विवेचन व सुश्राव्य सादरीकरणातुन उलगडत असतातं.
गेल्या तीन वर्षांतील कीर्तनमालेत शिवचरित्र , शौर्य गाथा छत्रपती शंभूराजांची , छत्रपती शंभूराजे यांचे नंतर स्वराज्याचे विरोधातील बलाढ्य शत्रूं विरूद्ध लढा कायम ठेवणारे छत्रपती राजाराम महाराज , ताराराणी , शाहू महाराज , बाळाजी विश्वनाथ पेशवे , बाजीराव पेशवे यांच्या झुंजार कारकीर्दीचा मागोवा ह.भ.प. आफळेबुवां यांनी घेतला.
मराठेशाहीच्या इतिहासाचा मागोवा घेणारया येत्या कीर्तनमालेत रसिक श्रोत्यांना ‘पेशवाईचा सुवर्णकाळ’ ऐकता येणार आहे.

विनामूल्य प्रवेश : पहिल्या काही आसनरांगा विशेष अतिथी व आयोजक परिवारासाठी राखीव

दरवर्षी प्रमाणे कीर्तनमालेसाठी विनामूल्य प्रवेश असुन आसन व्यवस्थेतील पहिल्या काही रांगा विशेष अतिथी , आयोजक परिवार यांच्यासाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत याची रसिकांनी नोंद घ्यावी . इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र येथील जागेची मर्यादा लक्षात घेऊन रसिकांनी विनामूल्य प्रवेश आसन रांगा व्यवस्थेचा लाभ घेण्याचे दृष्टीने कार्यक्रमाचे नियोजित वेळेत उपस्थित रहावे असे आवाहन आयोजक श्री स्वामी चैतन्य परिवाराचे वतीने करण्यात आले आहे.