घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीतर्फे ‘खनिजांच्या विश्वात’ शैक्षणिक प्रदर्शनाचे चिपळूणमध्ये आयोजन

खेड (प्रतिनिधी) – घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी यांच्या वतीने “खनिजांच्या विश्वात (In the World of Minerals)” या शैक्षणिक प्रदर्शनाचे आयोजन शनिवार, दिनांक ३ जानेवारी २०२६ रोजी चिपळूण येथे करण्यात आले आहे. विज्ञानातील महत्त्वाच्या घटकांपैकी एक असलेल्या खनिजांच्या अभ्यासाला चालना देण्याच्या उद्देशाने हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले असून, सर्वसामान्य नागरिक, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच अभ्यासकांसाठी ते उपयुक्त ठरणार आहे.
“दगडात दडलेले विज्ञान समजून घ्या…” या संकल्पनेवर आधारित या प्रदर्शनामध्ये विविध प्रकारची खनिजे, दगड तसेच त्यांचे आकर्षक व अभ्यासपूर्ण नमुने सादर करण्यात येणार आहेत. खनिजांची निर्मिती प्रक्रिया, त्यांचे भौगोलिक महत्त्व, तसेच दैनंदिन जीवनातील व औद्योगिक क्षेत्रातील उपयोग याबाबत माहिती देण्यात येणार आहे. प्रत्यक्ष नमुन्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अभ्यास करण्याची संधी मिळणार असल्याने हे प्रदर्शन शैक्षणिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.
हे प्रदर्शन घरडा वाचनालय, पी.एन.जी. शोरूमसमोर, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या बाजूला, चिपळूण येथे सकाळी १० ते संध्याकाळी ५ या वेळेत सर्वांसाठी खुले राहणार आहे. खनिजांविषयी जनजागृती निर्माण करणे, विज्ञानाकडे विद्यार्थ्यांचा कल वाढवणे आणि निसर्गातील संपत्तीचे महत्त्व समजावून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे .या शैक्षणिक प्रदर्शनास नागरिकांनी, विद्यार्थ्यांनी व निसर्गप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य डॉ. पी. बी. पाटील तसेच स्थापत्य (सिव्हिल) अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख डॉ. वाय. आर. कुळकर्णी यांनी केले आहे.