निलंबनाच्या आरोपांवर जलाल भाई राजपुरकर यांचा संतप्त खुलासा; तालुकाध्यक्षांच्या अधिकारांवरच प्रश्नचिन्ह

खेड (प्रतिनिधी) — पक्षातून निलंबन केल्याच्या आरोपांवर तीव्र प्रतिक्रिया देत जलाल भाई राजपुरकर यांनी तालुकाध्यक्ष संजय जाधव यांच्यावर जोरदार टीका केली आहे. “मला आजपर्यंत निलंबनाचे कोणतेही पत्र प्राप्त झालेले नाही. मग कोणत्या अधिकाराने आणि कोणत्या आधारावर मला निलंबित केल्याचा दावा केला जात आहे?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
राजपुरकर यांनी स्पष्ट केले की, पक्षाच्या घटनेनुसार तालुकाध्यक्षांना कोणत्याही कार्यकर्त्याला किंवा पदाधिकाऱ्याला पक्षातून निलंबित करण्याचा अधिकार नाही. असे असताना संजय जाधव यांनी माध्यमांमध्ये दिलेली विधाने ही पक्ष घटनेच्या विरोधात असून, यापूर्वीही त्यांनी अशाच प्रकारे घटनेचे उल्लंघन केल्याचा आरोप त्यांनी केला. पक्ष हा कोणाची खासगी कंपनी नसून, त्याची ठराविक घटना व शिस्त आहे. कोणाला आज घेतले आणि उद्या काढून टाकले, असा कारभार येथे चालणार नाही, असेही त्यांनी ठणकावून सांगितले. तालुकाध्यक्ष म्हणून संजय जाधव यांनी पक्षहितासाठी नेमके काय काम केले, याचाही जाब राजपुरकर यांनी विचारला. ग्राम समित्या स्थापन करणे, कार्यकारिणी जाहीर करणे, पक्ष मेळावे घेणे, नगरपरिषद, पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांसाठी तयारी करणे, इच्छुक उमेदवारांकडून फॉर्म मागवणे किंवा उमेदवारांची नावे गोळा करणे, यापैकी कोणतेही ठोस काम त्यांनी केलेले नाही, असा आरोप त्यांनी केला. केवळ बाता मारण्याचे काम सुरू असून प्रत्यक्षात पक्ष बांधणीसाठी काहीच केलेले नाही, अशी टीकाही त्यांनी केली.
याशिवाय, तालुकाध्यक्षपदासाठी थांबण्यास सांगितले असताना प्रदेशाध्यक्षांच्या विरोधात माध्यमांना दिलेल्या बातम्यांची आठवण करून देत, त्या घटनाही आम्ही विसरलेलो नाही, असे राजपुरकर म्हणाले. जिल्हाध्यक्ष हे त्यांचे भाऊ असल्याने कदाचित बंधुप्रेमापोटी असे वर्तन होत असेल, परंतु पक्षहिताच्या दृष्टीने हे वक्तव्य पूर्णपणे चुकीचे आहे, असे त्यांनी नमूद केले.
पक्षात मतप्रदर्शन करणे किंवा वेगळे मत मांडणे हे पक्ष सक्रिय असल्याचे लक्षण असून, त्यासाठी आवाज दाबण्याचा प्रयत्न करणे योग्य नाही. माझ्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न या माध्यमातून होत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. घटनेने दिलेल्या अधिकारांवर गदा आणली जात असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. या संपूर्ण प्रकरणाबाबत आपण प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे तसेच पक्षाध्यक्ष अजितदादा पवार यांच्याकडे तक्रार मांडून योग्य तो खुलासा आणि न्याय मिळवणार असल्याचे राजपुरकर यांनी सांगितले. तसेच, संजय जाधव यांनी भविष्यात अशी खोडसाळ आणि दिशाभूल करणारी वक्तव्ये करू नयेत, आपले अज्ञान लोकांसमोर प्रदर्शित करू नये, असा इशाराही त्यांनी दिला आहे. या घडामोडींमुळे तालुक्यातील राजकीय वातावरण तापले असून, पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.