३० व ३१ डिसेंबर रोजी दाजीपूर अभयारण्य पर्यटनासाठी बंद…

कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी वनविभागाची दक्षता…

प्रतिनिधी/ रोहन कांबळे
राधानगरी: नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण व वन्यजीवांच्या संरक्षणासाठी राधानगरी व दाजीपूर अभयारण्य ३० व ३१ डिसेंबर २०२५ रोजी पर्यटकांसाठी पूर्णतः बंद ठेवण्याचा निर्णय वनविभागाने घेतला आहे.
कोणीही या अभयारण्यक्षेत्रात या दोन दिवसांत प्रवेश केल्यास कारवाईचा इशारा वन्यजीव विभागाने दिला. सलग दोन्ही दिवस अभयारण्यक्षेत्रात वन्यजीव विभागाच्या कर्मचाऱ्यांची गस्तीपथके तैनात राहणार आहेत. वन्यजीव विभागाच्या कर्मचाऱ्याना त्यांच्या नियत क्षेत्रात कार्यरत राहणे सक्तीचे करण्यात आले आहे. काही महिन्यात अभयारण्यक्षेत्रात पर्यटकांचा ओघ वाढता आहे. मात्र वर्षाअखेर आणि नववर्ष प्रारंभाला पर्यटकांकडून हेणाऱ्या जेवणावेळी व पार्ट्या रोखण्यासाठी वन्यजीव विभागाने ही विशेष दक्षता घेतली आहे.या काळात पार्टी, मद्यपान, जेवण बनवणे, शिकार व अनुचित प्रकार रोखण्यासाठी कडक उपाययोजना राबवल्या जातील. विभागीय वन अधिकारी कोल्हापूर, एस. एस पवार यांच्या आदेशानुसार अभयारण्यात दिवस-रात्र गस्त ठेवली जाईल आणि गैरप्रकार आढळल्यास वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत कारवाई होईल.असा इशारा वनविभागाने दिला आहे.