पक्षविरहित काम करणार -नवनिर्वाचित नगराध्यक्षा नीता मालप

नवनिर्वाचित नगराध्यक्षांनी पदभार स्वीकारला
गुहागर प्रतिनिधी
आपण सर्वांनी जो विश्वास या निवडणुकीत दाखवला तो नक्कीच मी सार्थ ठरवेन. सर्वांना सोबत घेऊन पक्षविरहित काम करणार असून नेहमीच माझ्याकडून गुहागरच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य असेल असा विश्वास गुहागरच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा नीता मालप यांनी दिला. गुहागर नगरपंचायतमध्ये नगराध्यक्ष पदी विराजमान झाल्यानंतर त्या बोलत होत्या.
त्या पुढे म्हणाल्या की, युतीच्या माध्यमातून जनतेने आपल्याला निवडून दिले आहे. त्यामुळे आपण युतीच्या माध्यमातून उत्कृष्ट काम करूया आणि येथील जनतेचा विश्वास सार्थ ठरवूया.त्यासाठी प्रत्येकाने पक्षाचे झेंडे बाजूला ठेवावे. गुहागर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी स्वप्निल चव्हाण व भाजप नेते माजी आम. विनय नातू यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पदग्रहण सोहळा पार पडला. यावेळी बोलताना माजी आम. नातू म्हणाले की गुहागरला एक आदर्शवत नगरपंचायत सर्वांनी मिळून बनवूया केंद्रात व राज्यात महायुतीची सत्ता आहे त्यामुळे येथील विकासासाठी कधीच निधी कमी पडणार नाही.
यावेळी माजी नगराध्यक्ष राजेश बेंडल, भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, शिंदे सेनेचे तालुकाध्यक्ष दीपक कनगुटकर, भाजपा तालुका अध्यक्ष अभय भाटकर, भाजपा जिल्हा सरचिटणीस निलेश सुर्वे,भाजपा तालुका सरचिटणीस सचिन ओक,संतोष सांगळे, नरेश पवार, प्रांजली कचरेकर तसेच नवनिर्वाचित नगरसेवक भाजप सेना युतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी विविध स्तरातून व विविध पक्षातून नूतन नगराध्यक्षा नीता मालप यांना शुभेच्छा दिल्या. भाजपच्या माध्यमातून याठिकाणी पहिल्यांदा नगराध्यक्ष विराजमान झाल्याने येथील पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यामध्ये उत्साहाचे वातावरण आहे.