सावंतवाडी-सातोसे बस फेरी सातार्डापर्यंत नेऊन विद्यार्थ्यांची गैरसोय टाळा 

माजी सरपंच उदय पारिपत्ये यांचे आगारप्रमुखांना निवेदन 

सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी बस स्थानकातून सुटणारी ‘सावंतवाडी-सातोसे’ ही बस फेरी सातार्डा गावापर्यंत वाढवण्यात यावी, जेणेकरून शालेय विद्यार्थी आणि ग्रामस्थांची होणारी गैरसोय दूर होईल, अशी मागणी सातार्डा गावचे माजी सरपंच उदय पारिपत्ते यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी आगारप्रमुख निलेश गावित यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. आगारप्रमुखांनी यावर सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे.

सावंतवाडी आगारातून दररोज दुपारी १२ वाजता सावंतवाडी-सातोसे ही बस सुटते. ही बस बांद्यामार्गे सातोसेपर्यंत जाते आणि तिथूनच पुन्हा सावंतवाडीकडे परतते. सातार्डा आणि सातोसे भागातील अनेक विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी सावंतवाडी व बांदा येथे जातात. मात्र, ही बस सातोसेमध्येच थांबत असल्याने सातार्डा गावातील विद्यार्थ्यांना तिथून पुढे खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो. यामुळे त्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असून वेळेचाही अपव्यय होत आहे.

प्रशासकीय कामांसाठी सातार्डा केंद्र

सातोसे गावातील तलाठी कार्यालय, रेशन दुकान आणि इतर महत्त्वाची शासकीय कार्यालये सातार्डा येथे आहेत. जर ही बस फेरी सातार्डापर्यंत वाढवली, तर सातोसे येथील ग्रामस्थांनाही आपल्या कामासाठी सातार्डा गाठणे सोपे होईल. या दुहेरी फायद्याचा विचार करून बसची मर्यादा वाढवण्याची विनंती निवेदनातून करण्यात आली आहे.

प्रमुख नेत्यांची उपस्थिती

यावेळी आगारप्रमुखांसोबत झालेल्या चर्चेत शिवसेनेचे विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ, उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार, तालुकाप्रमुख राजू शेटकर, युवा सेना तालुकाप्रमुख आशिष सुभेदार, ग्रामपंचायत सदस्य वासुदेव राऊळ, युवा सेनेचे योगेश गोवेकर, सामाजिक कार्यकर्ते किरण प्रभू आदी मान्यवर उपस्थित होते.

या मागणीचे गांभीर्य लक्षात घेऊन आगारप्रमुख निलेश गावित यांनी ही बस फेरी सातार्डापर्यंत सुरू करण्यासाठी लवकरात लवकर प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असे स्पष्ट केले आहे.