देवगड :देवगड–जामसांडे नगरपंचायतीच्या वतीने भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच नागरिकांच्या आरोग्य सुरक्षेच्या दृष्टीने राबविण्यात येणाऱ्या भटक्या श्वानांचे निर्बीजीकरण व अँटी रेबीज लसीकरण मोहिमेचा शुभारंभ माननीय पालकमंत्री तथा बंदर विकास व मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या शुभ हस्ते पार पडला.
ही मोहिम निर्मिती पीपल्स अँड अॅनिमल वेल्फेअर सोसायटी, सुनीची आश्रय फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असून दिनांक ०५ जानेवारी ते १० जानेवारी २०२६ या कालावधीत ही मोहिम चालणार आहे. भटक्या कुत्र्यांचे शस्त्रक्रियेद्वारे निर्बीजीकरण तसेच अँटी रेबीज लसीकरण करण्यात येणार आहे. या उपक्रमाचा फीत कापून शुभारंभ प्रांत अधिकारी जगदीश काकतकर यांनी केला.
या कार्यक्रमाला माजी आमदार अजित गोगटे बाळ खडपे, देवगड–जामसांडे नगरपंचायतीचे मुख्याधिकारी गौरी पाटील, स्वच्छता सभापती बुवा तारी, बांधकाम सभापती रोहन खेडेकर, पाणीपुरवठा सभापती तनवी चांदोस्कर, तसेच सर्व नगरसेवक, भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना पालकमंत्री नितेश राणे म्हणाले की, “भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरणासाठी आवश्यक ती सर्व मदत शासनाच्या माध्यमातून केली जाईल. या मोहिमेमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेसह प्राणी कल्याणालाही चालना मिळेल.”
देवगड–जामसांडे शहर स्वच्छ, सुरक्षित व आरोग्यदायी ठेवण्यासाठी अशा उपक्रमांना शासनाचे सातत्याने पाठबळ राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.













