कात्रज-कोंढवा रस्त्यावर निर्जनस्थळी थरार
आठ जणांविरोधात खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल
पुण्यातील कात्रज-कोंढवा रस्त्यावर नववर्षाच्या पूर्वसंध्येला वापरलेल्या कारचा व्यवसाय करणाऱ्या तरुणावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आठ जणांनी संगनमत करून व्यापाऱ्याला निर्जनस्थळी नेऊन त्याची गाडी जबरदस्तीने हिसकावली. या घटनेत व्यापारी थोडक्यात बचावला असून, परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले असून चौघांना अटक करण्यात आली आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.
पुणे : 31 डिसेंबर रोजी रात्री 11.30 वाजता कात्रज-कोंढवा रोडवरील गोकुळनगर परिसरातील एका निर्जनस्थळी आठ जणांनी संगनमत करून वापरलेल्या गाड्यांचा व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्याची कार जबरदस्तीने हिसकावून घेतली. या घटनेनंतर आरोपींपैकी एका व्यक्तीने व्यापाऱ्याच्या दिशेने गोळीबार केला. सुदैवाने गोळी लक्ष्य चुकल्याने व्यापारी बचावला.
कोंढवा येथील खादी मशीन चौकात राहणाऱ्या 31 वर्षीय व्यापाऱ्याने या प्रकरणी येवलेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आठ जणांविरुद्ध खुनाचा प्रयत्न, दुखापत, घातक शस्त्रांचा वापर, अपहरण, गुन्हेगारी धमकावणे तसेच बेकायदेशीर जमाव या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस उपायुक्त (झोन V) राजलक्ष्मी शिवणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2 जानेवारी रोजी आकाश कृष्ण चाबुकश्वर (21) यांच्या हत्येप्रकरणी चार तरुणांना अटक करण्यात आली होती. चौकशीदरम्यान या आरोपींनी गोकुळनगर येथील गोळीबाराच्या घटनेचा खुलासा केला असून, त्यात त्यांचे काही मित्र सहभागी असल्याचे उघड झाले.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी आयुष कामठे, अभि म्हस्के, अभि पाटील आणि मंगेश माने यांना अटक केली आहे. या प्रकरणातील इतर चार आरोपी फरार असून, त्यांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
येवलेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अमर काळंगे यांनी प्रहार डिजिटलला दिलेल्या माहितीनुसार, काही महिन्यांपूर्वी फिर्यादी व्यापाऱ्याने जुन्या कारचे नूतनीकरण करून विक्रीसाठी ठेवले होते. आरोपींपैकी एकाने कार खरेदीची इच्छा दर्शवून पैसे न देता कार घेऊन गेला आणि वाटेत त्याचा अपघात झाला.
अपघातानंतर ती कार खराब अवस्थेत शोरूममध्ये परत करण्यात आली. यामुळे व्यापारी आणि आरोपी यांच्यात वाद झाला. व्यापाऱ्याने नुकसान भरपाईची मागणी केली, मात्र आरोपीने पैसे देण्यास नकार दिला.
यानंतर आरोपीने आपल्या मित्रांच्या मदतीने व्यापाऱ्याला जबरदस्तीने पळवून निर्जनस्थळी नेले. तेथे त्याला विवस्त्र करून धमकावण्यात आले आणि त्याच्या दिशेने गोळी झाडण्यात आली. मात्र गोळी लक्ष्य चुकल्याने मोठी अनर्थ टळली, असे पोलिसांनी सांगितले.
या घटनेमुळे कात्रज-कोंढवा परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांकडून तपास अधिक तीव्र करण्यात आला आहे.











