दापोली :
दापोली तालुक्यातील पंचनदी-कोळथरे परिसरात गेल्या दोन दिवसांपासून एका पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घातला असून आतापर्यंत ६ नागरिकांना कुत्र्याने चावा घेतल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कुत्रा चावलेल्या सर्व नागरिकांना तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर आवश्यक उपचार सुरू आहेत. वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून प्रतिबंधात्मक लसीकरण व उपचार करण्यात येत आहेत.
हा कुत्रा अद्याप मोकाट अवस्थेत असून तो पुन्हा नागरिकांवर हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी विशेष खबरदारी बाळगावी, एकटे बाहेर जाणे टाळावे तसेच लहान मुले व वृद्धांची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे. दरम्यान, प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन पिसाळलेल्या कुत्र्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.











