कलमठ ग्रामपंचायतीच्या विधवा प्रथा बंदी निर्णयाची राज्य महिला आयोगाकडून दखल

महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींसाठी दीपस्तंभ – रूपाली चाकणकर

कणकवली : तालुक्यातील कलमठ ग्रामपंचायतीने विधवा प्रथा बंद करण्यासाठी घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयाची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने दखल घेतली असून या निर्णयाचे विशेष कौतुक केले आहे. हा निर्णय महाराष्ट्रातील अनेक ग्रामपंचायतींसाठी दीपस्तंभ ठरेल, अशा शब्दांत महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी कलमठ ग्रामपंचायतीचे अभिनंदन केले आहे.

या निर्णयाबाबत महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या वतीने कलमठ ग्रामपंचायतीच्या सरपंच व ग्रामसेवक यांना विशेष अभिनंदन पत्र पाठविण्यात आले आहे. या पत्रात नमूद करण्यात आले आहे की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कलमठ ग्रामपंचायतीने आपल्या कार्यक्षेत्रात विधवा प्रथा पूर्णपणे बंद करण्याचा तसेच विधवा महिलांना घरपट्टी व पाणीपट्टी करामध्ये सवलत देण्याचा अत्यंत पुरोगामी व धाडसी निर्णय घेतला आहे.

आजही समाजातील विधवा महिलांना सन्मानाने जगण्यासाठी संघर्ष करावा लागत असताना, कलमठ ग्रामपंचायतीने सामाजिक अनिष्ट प्रथांवर घाव घालत विधवा महिलांना आर्थिक आधार देणारा आदर्श निर्णय घेतला आहे. घरपट्टी व पाणीपट्टीतील सवलतीमुळे एकल महिलांना कुटुंबाचा गाडा चालवण्यासाठी मोठी मदत मिळणार असून त्या सन्मानाने समाजाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होतील, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.

हा निर्णय संपूर्ण राज्यातील इतर हजारो ग्रामपंचायतींसाठी मार्गदर्शक ठरेल व अशा उपक्रमांचे अनुकरण करण्यासाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोग प्रयत्नशील राहील, असेही आयोगाने स्पष्ट केले आहे. महिलांच्या हक्कासाठी आणि सन्मानासाठी कार्य करणारी सर्वोच्च संस्था म्हणून महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने या निर्णयाचे मनापासून स्वागत करत कलमठ ग्रामपंचायतीचे अभिनंदन केले आहे.

भविष्यातही सिंधुदुर्ग जिल्ह्यात महिला सबलीकरणासाठी असेच नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जातील, अशी अपेक्षा व्यक्त करत महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी कलमठ ग्रामपंचायतीच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.