मराठमोळा गायक अवधूत गुप्ते यांच्या गीताने तरुणाईची पावले थिरकली!

वाशिष्ठी कृषी महोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमांना चिपळूणमधील कलारसिकांनी उत्स्फूर्तपणे दिली दाद

संतोष सावर्डेकर/चिपळूण

वाशिष्ठी डेअरी आयोजित कृषी महोत्सव दिवसेंदिवस बहरला. कृषी महोत्सवातील स्टॉल्स, पशुधन पाहण्याबरोबरच सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानीचा चिपळूणवासीयांनी आनंद लुटला. ‘ ‘मावळा- स्वराज्याचे शिलेदार’ हा कार्यक्रम म्हणजे इतिहास शौर्य आणि स्वाभिमानाचा जिवंत जागर ठरला. तर मँगोज इव्हेंट्स आयोजित अवधूत गुप्ते यांच्या संगीताच्या कार्यक्रमाने तरुणाईला डुलायला, थिरकायला लावले. अवधूत गुप्ते यांच्यासह ईशानी पाटणकर, विकास धुरी, अनुष्का शिकतोडे यांच्या गाण्यांवर टाळ्यांचा कडकडाट शिट्ट्यांच्या आवाजाने वाशिष्ठी कृषी महोत्सव दणाणून गेले. ‘वन्स मोअर’ ने तर कल्लाच केला. तर शुक्रवारी अशोक हांडे प्रस्तुत ‘मै आवारा हूँ’ या सांस्कृतिक कार्यक्रमात देखील धमालच उडवून दिली.

वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाचे अध्यक्ष प्रशांत यादव मुख्य प्रवर्तक सौ. स्वप्ना यादव यांच्या संकल्पनेतून गेल्या तीन वर्षांपासून वाशिष्ठी कृषी व पशुधन प्रदर्शन दिनांक ५ ते ९ जानेवारी दरम्यान आयोजित केले जात आहे. यावर्षी देखील या कृषी महोत्सवाला कोकणवासियांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कृषी महोत्सवातील स्टॉल्स, पशुधन, पाककला स्पर्धा यांना उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. याचबरोबर जुन्या पद्धतीची घरे, फळबाग लागवडीचा लाईव्ह डेमो पाहण्यासाठी कोकणवासीयांनी गर्दी केली होती.

तर दुसरीकडे गेली चार दिवस रात्रीच्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी चिपळूणवासीयांचे मनोरंजन केलेच शिवाय या कार्यक्रमांना देखील कला रसिकांनी तितक्याच ताकदीने दाद दिली. तर दररोज धार्मिक कार्यक्रम देखील झाले. हरिपाठ, कीर्तन, भजन या कार्यक्रमांनी कृषी महोत्सवात भक्तीमय वातावरण निर्माण झाल्याचे पहावयास मिळाले. दिनांक ६ रोजी रात्री ‘वारी सोहळा संतांचा’ या धार्मिक कार्यक्रमात विठ्ठल नामाच्या जयघोषाने उपस्थित दंग होऊन गेले होते. तर दिनांक ७ रोजी ‘ मावळा स्वराज्याचे शिलेदार’ या कार्यक्रमाचे सादरीकरण झाले. हा कार्यक्रम म्हणजे इतिहास, शौर्य आणि स्वाभिमानाचा जिवंत जागर ठरला. छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यासाठी ज्यांनी आपले सर्वस्व अर्पण केले. त्या मावळ्यांच्या पराक्रमाची आठवण करून देणारा हा कार्यक्रम प्रत्येक मराठी मनाला अभिमानाने भरून टाकणारा ठरला. ढोल- ताशांचा गजर मर्दानी शस्त्रकला, स्वराज्यनिष्ठ मावळ्यांची ज्वलंत मिरवणूक आणि उपस्थितांची उत्स्फूर्त दाद यामुळे संपूर्ण परिसर इतिहासाच्या साक्षीदारासारखा भारावून गेला.

*तरुणाईची धम्माल तर कला रसिकांची उत्स्फूर्त दाद*

गुरुवार दिनांक ९ रोजी अवधूत गुप्ते- लाईव्ह परफॉर्मन्स या कार्यक्रमाचे सादरीकरण झाले. गायक विकास धुरी यांनी गणरायांच्या गीताने कार्यक्रमाला सुरुवात केली. नंतर यांनी एकापेक्षा एक गीते सादर करून कार्यक्रमांमध्ये रंगत आणली चिपळूणमधील कला रसिकांची दाद मिळवली. मेरी मधुबाला, जेवला का पाहुण, सखे ग साजणी, माझी आजी म्हणायची ओवी ही जात्यावर, भीम बनला सावली कोटी कोटींच्या माथ्यावर, काय सांगू हिला गाव सुटना, कसं सांगू राणी मला गाव सुटना, कांदे पोहे, ढगाला लागली कळ, पाणी थेंब थेंब गळं अशी अनेक गाणी अवधूत गुप्ते गात असताना चिपळूणवासियांनी टाळ्यांचा शिट्यांचा कडकडाट केला. तरुणाईची हळूहळू पावले थिरकली आणि या तरुणाईने रंगमंचासह -समोर धमालच उडवून दिली यामध्ये बालकांचा देखील समावेश होता.

*गायक अवधूत गुप्ते यांच्या गीतांचा शो मोठ्या उत्साहात*

एकंदरीत वाशिष्ठी कृषी महोत्सवाच्या रंगमंचावर प्रसिद्ध मराठमोळा गायक अवधूत गुप्ते यांच्या गीतांचा लाईव्ह शो मोठ्या उत्साहात आणि अभूतपूर्व प्रतिसादात संपन्न झाला. शेती, माती, नाती, संघर्ष आणि स्वप्नं या सगळ्यांना शब्द-सुरांची साथ देणाऱ्या त्यांच्या गीतांनी उपस्थितांच्या मनाला थेट हात घातला. गाण्यांच्या प्रत्येक ओळीतून महाराष्ट्राची ओळख, ग्रामीण संस्कृतीचा आत्मा आणि मराठी माणसाची भावना आधोरेखित होत होती. त्यामुळे या कार्यक्रमाने तरुण पिढीला केवळ मनोरंजन नाही, तर मराठी गीतपरंपरेची ओळख आणि मूल्यांची जाणीव करून दिली.

याप्रसंगी लाईव्ह बँड, प्रकाशयोजना, रंगमंचावरील ऊर्जा आणि प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे संपूर्ण परिसर भारावून गेला. गाण्यांमधील संवाद, मिश्किल किस्से आणि भावनिक क्षणांनी प्रेक्षकांना हसवले आणि अंतर्मुख सुद्धा केले. त्यामुळे शेती, पशुधन आणि विकासाच्या चर्चांमध्ये रमलेल्या महोत्सवाला या सांस्कृतिक कार्यक्रमाने एक वेगळी उंची दिली आणि कोकणवासीयांच्या मनात दीर्घकाळ टिकणारी आठवण निर्माण केली. ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा, या गीताने कार्यक्रमाचा समारोप झाला. हा कार्यक्रम इतका बहरदार झाला की चिपळूणमधील कलारसिकांनी शेवटच्या गाण्यापर्यंत आपली खुर्ची सोडली नव्हती.

या कार्यक्रमादरम्यान वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाचे अध्यक्ष प्रशांत यादव, मुख्य प्रवर्तक स्वप्ना यादव यांनी नामवंत गायक अवधूत गुप्ते यांच्यासह अन्य गायकांचा सन्मान केला. तर कृषी महोत्सव व सांस्कृतिक कार्यक्रमांना चिपळूणवासीयांनी दिलेल्या प्रतिसाद बद्दल प्रशांत यादव यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

*पाककलेला उत्स्फूर्त प्रतिसाद तर मथुरला पाहण्यासाठी गर्दी*

या कृषी व पशुधन प्रदर्शनात शुक्रवारी पार पडलेल्या पाककला (तिखट) स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत ४० महिलांनी आपले नाविन्यपूर्ण तिखट पदार्थ सादर केले. बिन जोड शर्यतीचा बादशहा पब्लिक किंग पाटलांचा तरुण तडफदार मथुर १००१ या नामवंत बैलाचे आगमन होताच उपस्थितीतांनी एकच जल्लोष केला. या मथुरचे वाशिष्ठी डेअरी प्रकल्पातर्फे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. या मथुरला पाहण्यासाठी एकच गर्दी झाली होती. अबाल वृद्धांसह तरुणाई मथुरची छबी आपल्या मोबाईलच्या कॅमेरात टिपण्यासाठी गर्दी करत होते. शुक्रवारी रात्री ८ वाजता मथुरचे प्रस्थान झाले. अवधूत गुप्ते यांच्या लाईव्ह परफॉर्मन्स या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिजीत गोडबोले तर कृषी महोत्सवाचे सूत्रसंचालन अमोल टाकळे यांनी केले.