नारळ विकास बोर्ड व कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी नोंदणीचे आवाहन

 

नारळ विकास बोर्ड व कृषी विभागाच्या माध्यमातून नारळ बागायतदारांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध लाभदायक योजनांचा प्रभावी लाभ मिळवण्यासाठी नोंदणी करणे अत्यंत आवश्यक असल्याचे आवाहन करण्यात आले आहे. यामध्ये पाम इन्शुरन्स (माड विमा योजना) ही अत्यंत महत्त्वाची योजना असून, आवश्यक प्रशासकीय पाठपुरावा न झाल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजपर्यंत ही योजना प्रभावीपणे राबवली गेली नव्हती.

सुमारे चार महिन्यांपूर्वी नारळ विकास बोर्डाचे डेप्युटी डायरेक्टर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याला भेट देऊन जिल्हा कृषी कार्यालयात बैठक घेतली होती. या बैठकीत नारळ बागायतदारांच्या याद्या मागविण्यात आल्या असून, योजना राबविण्यासाठी सिंधुदुर्ग नारळ बागायतदार संघाचे सहकार्य मागण्यात आले आहे. त्यानुसार सध्या जिल्ह्यातील नारळ बागायतदारांची नोंदणी व याद्या तयार करण्याचे काम सुरू आहे.

या सुधारित पाम इन्शुरन्स योजनेअंतर्गत विम्याच्या ८५ टक्के रक्कम नारळ विकास बोर्डाकडून भरली जाणार असून उर्वरित १५ टक्के रक्कम बागायतदारांनी भरायची आहे. सध्या वादळी वारे, अतिवृष्टी यामुळे माड उन्मळून पडल्यास तलाठी व कृषी सहाय्यकांकडून पंचनामा करून केवळ सुमारे १५० रुपयांची तुटपुंजी नुकसानभरपाई दिली जाते. मात्र या विमा योजनेमुळे नारळ बागायतदारांना प्रत्यक्ष नुकसानभरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

या १५ टक्के विमा हप्त्यातील संपूर्ण किंवा काही भाग महाराष्ट्र शासनामार्फत भरावा, यासाठी सिंधुदुर्ग नारळ बागायतदार संघाचे प्रयत्न सुरू आहेत.

याशिवाय नारळ बागायतदारांसाठी खालील महत्त्वाच्या योजना उपलब्ध आहेत —

नारळ पाडपींसाठी वार्षिक फक्त २०० रुपयांत ७ लाख रुपयांचा विमा, जुनी व रोगट तसेच उत्पन्न न देणारी झाडे तोडण्यासाठी अनुदान व नवीन नारळ लागवडीसाठी स्वतंत्र अनुदान (या योजनेसाठी १०७ कोटी रुपयांचा निधी मंजूर), नारळ पाडपी प्रशिक्षणासोबत शिडी किंवा मशीन मोफत देण्याची योजना, क्लस्टर पद्धतीने लागवड करणाऱ्या बागायतदारांना दोन वर्षांसाठी संपूर्ण बागेला लागणारे खत मोफत देणे, नारळ विपणनासाठी तसेच नारळ प्रक्रिया उद्योगासाठी तांत्रिक व आर्थिक सहाय्याच्या सरकारी योजना राबविल्या जात आहेत.

या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी नोंदणी करणे अनिवार्य असून, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नारळ बागायतदारांनी वेंगुर्ला, सावंतवाडी, दोडामार्ग व कुडाळ तालुक्यासाठी समीर प्रभूखानोलकर (मो. ९२०९११८५३५) यांच्याशी तसेच मालवण, देवगड, कणकवली व वैभववाडी तालुक्यासाठी आनंद हुले (मो. ९८६९९२५७२८) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.