कात उद्योजकांच्या समस्या सोडविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार : केंद्रीय मंत्री नारायण राणे

राजापूर | प्रतिनिधी : कात उत्पादक संघटनेने ज्या व्यावसायिक समस्या आणि अडचणी मांडल्या आहेत त्यांची सोडवणूक करण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत असे ठाम आश्वासन केंद्रीय उद्योग मंत्री नारायणराव राणे यांनी रत्नदुर्ग कात उत्पादक संघटनेच्या सदस्यांना दिले.

या संघटनेचे अध्यक्ष श्री.बाळा जाधव यांच्या नेतृत्वाखाली  ना.राणे साहेब यांची भेट घेऊन कोकणातील कात उद्योगातील जाचक नियम आणि अटी शिथिल करण्याची मागणी एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.या मध्ये कात उद्योगाला वूड बेस्ड इंडस्ट्री ऐवजी ॲग्रो बेस्ड इंडस्ट्री मधे समाविष्ट करण्यात यावे,राज्य स्तरीय समितीच्या कक्षेतून कात उद्योगाला वगळून लागू केलेली परमिट पद्धती रद्द करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे.तसेच शासनाच्या ईवेबिल प्रणाली वनखात्याने मान्य करून पुन्हा वहातुक पासाचा आग्रह धरू नये. या सर्व कायदेशीर तरतूदी गुंतागुंतीच्या असून अधिकारी वर्गा कडून दफ्तर दिरंगाई केली जाते.वर्षातून केवळ चार महिने प्रत्यक्ष उत्पादन होत असताना दफ्तर दिरंगाई मुळे व्यवसायिक त्रस्त झाले आहेत.

यावेळी मजिद पन्हळेकर, सुधाकर चांदोरकर, संदेश धुमाळे,विलास शेट्ये, जितेंद्र गावकर इ.प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.