सावंतवाडी उपनगराध्यक्षपदी भाजपचे ॲड. अनिल निरवडेकर

स्वीकृत नगरसेवकपदी भाजपचे ॲड. सिद्धार्थ भांबुरे तर शिवसेनेच्या ॲड. नीता कविटकर यांची निवड

सावंतवाडी | प्रतिनिधी : सावंतवाडी नगरपरिषदेच्या रिक्त असलेल्या उपनगराध्यक्ष पदाची निवड प्रक्रिया आज पार पडत पडली. यात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार ॲड. अनिल निरवडेकर यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार शिवसेना नगरसेवक अजय गोंदावळे यांच्यावर विजय मिळवला. ॲड. अनिल निरवडेकर यांना १२ तर अजय गोंदावळे यांना ७ मते मिळाली.
काँग्रेसचे तौकीर शेख व उबाठाचे देवेंद्र टेमकर तटस्थ राहिले.
सावंतवाडी नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष पदासाठी आज सकाळी नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले आणि भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष युवराज लखमराजे भोंसले यांच्या प्रमुख उपस्थितीत ॲड. अनिल निरवडेकर यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे आपला अर्ज सुपूर्द केला होता. तर शिवसेनेचे नगरसेवक अजय गोंदावळे यांनीही आपला उमेदवारी अर्ज मुख्याधिकाऱ्यांकडे सादर केला होता.


दुपारी छाननी प्रक्रिया पार पडल्यानंतर दोन्ही अर्ज कायम राहिल्याने निवडणूक प्रक्रिया पार पडली.
यात ॲड. अनिल निरवडेकर यांना नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांच्यासह नगरसेवक सुधीर आडीवरेकर, आनंद नेवगी, प्रतिक बांदेकर, दीपाली भालेकर, मोहिनी मडगांवकर, नीलम नाईक, वीणा जाधव, सुनिता पेडणेकर, दुलारी रांगणेकर, सुकन्या टोपले यांची मिळून एकूण १२ तर शिवसेनेला नगरसेवक संजू परब, बाबू कुडतरकर, नगरसेविका शर्वरी धारगळकर, ॲड. सायली दुभाषी आणि स्नेहा नाईक यांची मिळून एकूण ७ मते मिळाली. तर काँग्रेसचे तौकीर शेख व उबाठाचे देवेंद्र टेमकर तटस्थ राहिले.
यानंतर नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांनी ॲड. अनिल निरवडेकर हे विजयी झाल्याचे घोषित केले. यावेळी भाजपच्या नगरसेवकांनी टाळ्या व बाके वाजवून त्यांचे अभिनंदन केले.

स्वीकृत सदस्य पदी भाजपचे ॲड. सिद्धार्थ भांबुरे तर शिवसेनेच्या वतीने ॲड. नीता कविटकर यांची बिनविरोध निवड झाल्याचेही यावेळी नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांनी जाहीर केले.