खेड (प्रतिनिधी) – मुंबई–गोवा महामार्गावरील भोस्ते घाट येथे आज सकाळी कार आणि दुचाकीचा गंभीर अपघात झाला. चिपळूणहून पुण्याकडे जात असलेली मोटारसायकलची (क्रमांक MH 17 DH 5306) गतिरोधक न दिसल्याने पुढे जात असलेल्या फोरव्हिलर कारला (क्रमांक MH 08 AG 2363) पाठीमागून जोरदार धडक बसली. या अपघातात दुचाकीस्वार जखमी झाला आहे.
ही धडक इतकी जोरात होती की, मोटारसायकल रस्त्यावर दूर फेकली गेली. घटनास्थळी उपस्थित लोकांनी त्वरित मदतकार्य सुरू केले. त्याचदरम्यान भरणे नाका ब्रिजखाली सदैव सज्ज असलेली जगद्गुरु रामानंदाचार्य श्री नरेंद्राचार्य जी संस्थान नाणिज धाम यांची २४ तास विनामूल्य रुग्णवाहिका तत्काळ घटनास्थळी दाखल झाली.
जखमी दुचाकीस्वार विशाल घनसोडे (वय 28, रा. श्रीरामपूर) यांना तातडीने रुग्णवाहिकेमार्फत रॉयल हॉस्पिटल, भरणे येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. रुग्णवाहिका चालक सुरज हंबीर यांनी तत्काळ धाव घेऊन जखमीला आवश्यक प्राथमिक उपचार उपलब्ध करून दिले.
या अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास सुरू आहे. अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक मंदावली होती, मात्र पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.












